तरुणीला अश्लील मागणी; फोटो व्हायरल करून बदनामी

लग्नास नकार दिल्याने कृत्य, तरुणाविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणीला सतत फोन करून त्रास देणे, अश्लील मागणी करून भेटायला बोलावणे, तसेच तरुणीचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून फोटो व्हायरल करणा-या आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी ही यवतमाळ जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. तिला पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लागली. त्यामुळे ती झरी तालुक्यात नोकरीनिमित्त राहत आहे. दोन वर्षापूर्वी तिची आरोपी अमित संजय आडे (वय 27, रा. उमरसरा, यवतमाळ) याच्याशी ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये चांगला संपर्क होता, मात्र नोकरी लागल्यानंतर फिर्यादीने आरोपीशी संपर्क तोडला.

संपर्क तोडल्याने आरोपी तरुणाचा तिळपापड झाला. तो तरुणीला वारंवार मोबाईलवर फोन करून तुझा फोन बिझी का असते? तू कुणाशी बोलत राहते? “माझ्याशी बोल, नाहीतर तुझी बदनामी करीन” अशी धमकी द्यायचा. तसेच संपर्क तोडल्यास तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला मानसिक त्रास द्यायचा. दि. 25 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास आरोपीने पुन्हा फोन करून “माझ्याशी लग्न कर, मला भेटायला ये” अशी जबरदस्ती केली. मात्र तरुणीने नकार दिला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अश्लील उद्देशाने भेटण्यासाठी दबाव
तरुणीने लग्नास तसेच भेटण्यास नकार दिल्याने आरोपीने तिची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु केला. आरोपीने तिचा मित्रासोबतच असलेला फोटो तिच्या मित्र-मैत्रिणींना पाठवला व तिच्याबाबत बदनामीकारक माहिती पसरवली. त्यामुळे तरुणीची प्रतिमा मित्र मैत्रिणीमध्ये मलिन झाली. तसेच आरोपी हा तरुणीला अश्लील उद्देश ठेवून भेटण्याचा दबाव टाकत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकारामुळे फिर्यादीला मानसिक त्रास सहन करावा लागत असून तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तिने पाटण पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अमित आडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 351(2), 356, 75(1) व 78(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.