तरुणाचा फडशा पाडणा-या वाघाला हुसकावण्यात यश

वाघाला पाहण्यासाठी व व्हिडीओ काढण्यासाठी पिरवडोल येथे बघ्यांची जत्रा, सुमारे 4 तास सुरू होता वाघाचा थरार

0

सुशील ओझा, झरी/ पाटण प्रतिनिधी: पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या अविनाश पवन लनगुरे (17) या तरुणाचा वाघाने फडशा पाडला. सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. वाघ शिकारीजवळच असून शिकार खात आहे कळताच हा थरार बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सुमारे 2 ते 3 हजारांची गर्दी याठिकाणी गोळा झाली होती. वाघाला पाहण्यासाठी व व्हिडीओ शुटिंग करण्यासाठी बघ्यांची एकच झुंबड उडाली होती. दुसरीकडे वाघाला हुसकवण्याचे प्रयत्नही सुरू होते. अखेर 4 तासानंतर सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचा-यांना वाघाला हुसकावण्यात यश आले. दरम्यान वाघ तीन ते चार तास शिकार खात असताना वाघाला हुसकावण्यात का आले नाही? असा सवाल करत प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत पर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका अविनाशचे कुटुबींय व गावक-यांनी घेतली आहे.  

सविस्तर वृत्त असे की झरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर पाटणबोरीपासून 4 किलोमीटर अंतरवर पिवरडोल हे गाव आहे. गावात अविनाश पवन लेनगुरे (17) हा तरुण राहायचा. तो 10 वर्गात शिकत होता. शनिवारी दिनांक 9 जुलै रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास अविनाश गावा लगतच्या शेतशिवारात शौचास गेला होता. रात्री उशिरापर्यंत अविनाश घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी अविनाशचा शोध घेणे सुरू केले. मात्र अविनाश आढळून आला नाही. त्यामुळे रात्रभर शोधाशोध सुरु होती.

सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास गावातील व्यक्ती गावाबाहेर शौचास गेली असता त्यांना तिथे टमरेल, मोबाईल व रक्त आढळून आले. त्यांनी आजूबाजूला बघताच काही फुटाच्या अंतरावर झुडपात वाघ शिकार खात असताना दिसला. हा थरारक प्रसंग पाहून लोकांनी तातडीने गावक-यांना माहिती दिली. गावक-यांनी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी, पाटण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार संगिता हेलांडे, मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुले घटनास्थळी रवाना झाले.

सकाळी 7 वाजेपर्यंत गर्दी हजारांपेक्षा अधिक झाली. वनविभागाच्या कर्मचा-यांनी नागरिकांना घटनास्थळाच्या दूर केले. एका तासातच बघ्यांची गर्दी दुप्पट झाली. वाघ अध्येमध्ये शिकार खाऊन झुडुपाच्या बाहेर यायचा व परत आत जायचा. ये दृश्य मोबाईलवर शुट करण्यासाठी बघ्यांची झुंबड उडाली होती. दरम्यान वाघ शिकारीपासून दूर जाण्याची चिन्ह नव्हते. 10.15 वाजताच्या सुमारास गावकरी व वनविभागाच्या कर्मचा-यांनी आरडा ओरड करून वाघाला हुसकावले व वाघ शिकार सोडून शेताच्या मार्गातून वेगाने निघून गेला.

कर्मचा-यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता ते दृश्य अतिशय थरारक होते. वाघाने मृतकाच्या संपूर्ण शरिराचे लचके तोडले होते. जवळच एका पायाचा तुकडा पडलेला होता. तर मांडी संपूर्ण खाल्लेल्या अस्वस्थेत आढळून आली. याशिवाय मानेला आणि इतर जागीही जखमा आढळून आल्यात. मृतक अविनाश शौचास बसलेला असताना वाघाने त्याला फरफटत झुडुपात नेले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वाघ मांडवी परिसरातीलच का?
पिवरडोलपासून दोन किलोमीटर अंतरावर मांडवी गाव आहे. या गावालगतच्या शेतशिवारात बिजली या वाघिणीचा तिच्या बछड्यासह तर रंगिला व नुरा अशा वाघांसह एकूण 5 वाघांचा मुक्त संचार गेल्या आठवड्यापासून होता. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. रंगिला किंवा नुरा यातीलच एक वाघ हा पिवरडोल इथे आले असावा असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.

दुपारी 11.30 वाजताच्या सुमारास वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे घटनास्थळी पोहचले. याशिवाय उपविभागीय पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहे. दरम्यान वाघ तीन ते चार तास शिकार खात असताना वाघाला हुसकावण्यात का आले नाही? असा सवाल करत या प्रकरणी ठोस आश्वासन मिळत पर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका अविनाशचे कुटुबींय व गावक-यांनी घेतली आहे.  सदर घटनेमुळे संपूर्ण परिसर ढवळून निघाला आहे.  एका तरुणाचा असा थरारक मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या गावात शोकाकूल वातावरण असून तणावपूर्ण शांतता आहे.  

फोटो व्हिडीओ साभार – दशरथ बुरेवार

(या बातमीचे काही अपडेट आल्यास ते इथे अपडेट केले जाईल.)

पाहा वाघ पळतानाचा व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.