वणी: वणीतील गुरुवर्य कॉलनीमध्ये परिसरातील महिलांनी वृक्षारोपण केलं. परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी विविध वृक्ष लावून वृक्षरोपण चळवळीला सुरूवात केली आहे. यावेळी केवळ झाड लावणे इतक्यावरच न थांबता लावलेल्या झाडांचं संगोपणही करायचं असा निर्धार यावेळी महिलांनी केला.
परिसरातील प्रदूषणात वाढ होत आहे. परिणामी तापमान वाढ होताना दिसत आहे. शहरात वृक्षांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे परिसरात झाडं लावण्याचा निर्णय गुरुवर्य कॉलनीतील महिलांनी घेतला. त्यानुसार त्यांनी परिसरात कडुलिंब, वड, पिंपळ, करंजी इत्यादी झाडं लावली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि उत्तम आरोग्य राहण्यासाठी या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन महिलांनी केलं.
या वृक्षारोपण कार्यक्रमात वार्ड क्रमांक 1 च्या नगरसेविका वर्षाताई खुसपुरे गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्या विद्याताई जुनगरी, थेरे, पावडे, ठक, भोयर, ईदे, नगरकर आणि परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते.