वृक्ष लागवडीच्या नावाखाली ‘मनी’प्लान्टची लागवड !
सामाजिक वनीकरणाचा कार्यक्रम फेल. मग शासनाचा निधी गेला कुठे?
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत राबविलेल्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या कार्यक्रमात गैरप्रकार झाला असून सामाजिक वनीकरण हा उपक्रम ‘मनी’करण तर झाला नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. वृक्ष लागवडी ऐवजी भ्रष्टाचाराच्या खतपाण्याने भरगोस लागवड केल्या जाणा-या ‘मनी’प्लान्टवर वरिष्ठांनी तात्काळ कार्यवाहीची फवारणी करणे गरजेचे असल्याची अपेक्षा तालुक्यातून व्यक्त केली जात आहे.
पर्यावरण वाचवण्यासाठी वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्चून गेल्या अनेक वर्षा पासून वृक्ष लागवडीचे कार्यक्रम सुरू आहे. मात्र मारेगाव तालुक्यात वृक्षलागवड व वृक्षारोपण कार्यक्रमाचा फज्जा उडाला आहे. कार्यक्रमाचा फज्जा उडाला असेल तर त्यासाठी आलेला निधी कुठे गेला? हा प्रश्न आता विचारला जात आहे.
तालुक्यात सामाजिक वनीकरण अंतर्गत घोगुलदरा गट क्र. 163 मध्ये रोपवाटिका आहे. श्रीरामपूर येथे गट वृक्ष लागवड भाग 1 ते 3 मध्ये 35 हजार वृक्ष लागवड केली आहे. तालुक्यात सामाजिक वनीकरण अंतर्गत मार्डी ते चिंचमंडल, चोपण, वनोजादेवी, सिंधी, हिवरा तसेच हिवरा ते दांडगाव, वनोजदेवी ते दंडगाव, हिवरा ते मार्डी, मार्डी ते केगाव, मार्डी ते गाडेगाव, वनोजदेवी ते पिसगाव या साईटवर 5 हजार वृक्ष लागवडीचे टारगेट असताना ते आज पर्यंत पूर्ण झालेले नाही.
वृक्ष लागवडीच्या निधीतून ‘मनी’प्लान्टची लागवड?
या विभागातील एका अधिका-याची सध्या चांगलीच चलती आहे. वृक्ष लागवडीऐवजी हा अधिकारी शासनाकडून आलेल्या निधीतून स्वत:च्या घरी ‘मनी’प्लान्टची लागवड करीत असल्याचा आरोप होत आहे. ‘मनी’प्लान्टचे भरगोस पीक येण्यासाठी हा अधिकारी स्वत:चे तसेच आपल्या आप्त व नातलगाचे वाहन वापरत असल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या आहे. मात्र लागवडीसाठी तालुक्याबाहेरून मजूर का आणले जात आहे? यात कोणते हित संबंध आहे हे देखील एक न उलगडलेले कोडे आहे.
या संपू्र्ण प्रकरणात माहिती मागितली असता सदर अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. यात काही गौडबंगाल असल्याने तर ही माहिती देण्यास टाळाटाळ नाही असा संशय या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. या भ्रष्ट अधिका-याच्या कामाची चौकशी करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.