‘‘प्लास्टिक प्लास्टिक चोहीकडे, गं बाई गेली बंदी कुणीकडे’’
प्लास्टिक संदर्भात नागरिक उदासीन
सुशील ओझा, झरी: सर्वसामान्य जनतेची प्लास्टिकबंदीमुळे बरीच अडचण झाली आहे. दैनंदिन वापरातून प्लास्टिक गायब होणे हे नागरिकांना अविश्वसनीय वाटत आहे. मोठ्याा शहरांमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर धडाक्यात कारवाई सुरू आहे. मात्र झरी तालुक्यात या बंदीचा बोजवारा उडाला आहे. नगरपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. त्यामुळे ‘‘प्लास्टिक प्लास्टिक चोहीकडे, गं बाई गेली बंदी कुणीकडे’’ असे चित्र परिसरात दिसून येत आहे.
केंद्र सरकारने नोटबंदी केली तर राज्य सरकारने प्लास्टिकबंदी केली. मात्र या बंदीमुळे मोठ्या दुकानदारांवर कोणता परिणाम झाला. असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यात मुकुटबन, पाटण, झरी, अडेगाव, घोन्सासारखे इतरही अनेक खेड्यात प्लास्टिकचा खुलेआम वापर सुरू असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. किराणा दुकान, चिकन, मटण, मच्छी, स्टेशनरी दुकान, पानटपरी, भाजीपाला दुकान, बूक स्टॉल व इतर सर्वच दुकानातून प्लास्टिकचा वापर सर्रास सुरू आहे.
शासनाने कुणाच्याही हातात प्लास्टिकची पिशवी दिसली तर ५ हजार रुपये दंड ठोठाविण्याचा कायदा अमलात आणला आहे. याची जबाबदारी नगरपंचायतीवर सोपविली आहे. मात्र शहरासह तालुक्यात प्रशासनाकडून या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. यासाठी पथकही गठीत करण्यात आले आहे. मात्र, तालुक्यात याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिक वापरामुळे प्रदूषणात वाढ होणे तसेच पाळीव, जंगली जनावरे तर नदी नाल्यापासून तर समुद्रातील मासेसुद्धा प्लास्टिक खात असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे.