‘पीएम-किसान सन्मान निधी’चे काम रखडले, शेतकरी अनुदानापासून वंचित

मार्च 2021 पासून योजनेचे काम करण्यास महसूलचा बहिष्कार

जितेंद्र कोठारी, वणी: अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. महसूल, कृषी व ग्राम विकास विभागाच्या मदतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करुन त्यांच्या बँक खात्यात 6 हजार रुपये वार्षिक अनुदान जमा केले जाते. मात्र राज्य महसूल अधिकारी कर्मचारी संघटनांनी मार्च 2021 पासून पीएम किसान सन्मान योजनेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात मागील 16 महिन्यांपासून या योजनेचे काम पूर्णपणे रखडले आहे. याचा फटका वणी उपविभागातील शेतक-यांना देखील बसला आहे. परिसरातील शेकडो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.

तालुक्यातील रासा येथील शेतकरी राहुल शामराव धांडे यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये पीएम किसान सन्मान योजनेकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केला. परंतु 6 महिन्यानंतरही सदर शेतकऱ्याच्या अर्जाला शासनस्तरावरुन अप्रुव्हल मिळाले नाही. याबाबत शेतकरी राहुल धांडे यांनी आपले सरकार पोर्टलवर जिल्हाधिकारी यांना तक्रार केली. तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार वणी यांना अहवाल मागितला. दि. 4 जुलै 2022 रोजी तहसीलदार वणी यांनी जिल्हाधिकारी तसेच तक्रारदार शेतकरी यांना पत्र पाठवले. यात 8 मार्च 2021 पासून वणी तहसील कार्यालयात सदर काम बंद असल्याने सदर शेतकऱ्याच्या अर्जाला मान्यता देण्यात आली नसल्याचे कळवण्यात आले.

वणी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केलेली आहे. सर्व कागदपत्रांसह ऑनलाइन डाटा फिडिंग करण्यात आला. मात्र तहसीलदार यांच्याकडून अप्रुव्हल मिळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी सन्मान निधी पासून वंचित झाले आहे. नुकतेच जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी यांना पत्र लिहून डाटा दुरुस्तीसाठी गावपातळीवर शिबिर आयोजित करण्याची सूचना केली. पण महसूल विभाग हे कामकाज करीत नाही. त्यावर बहिष्कार टाकल्याचे तहसील कार्यालयातून सांगितले जाते.

‘पीएम किसान’चे काम कृषी विभागाकडे आहे, असे महसूल अधिकारी सांगत आहे. मात्र पी.एम. किसानबाबत आम्हाला शासनाचे आदेश, लॉगिन आयडी, पासवर्ड नाहीत असे उत्तर कृषी विभागाचे अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे या योजनेबाबत शेतकऱ्यांची मोठी कोंडी करण्यात आली आहे.

Comments are closed.