सावधान…! वणीत पोलिसांचे दंडे सुरू, अनेकांना ‘दे बत्ती’
पोलिसांचा संयम सुटला, नागरिक अद्यापही बेफिकीर
जब्बार चीनी वणी: गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांबाबत मवाळ भूमिका घेतलेल्या पोलिसांवर अखेर दंडे उगारण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही विनाकारण घराबाहेर पडणा-यांची संख्या कमी होत नव्हती. अखेर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. आज बाहेर निघालेल्या अनेकांना पोलिसांचे फटके मिळाल्याची माहिती आहे. टिळक चौक, तहसिल चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक इ ठिकाणी अनेक बाईक चालकांवर पोलिसांच्या हातचा प्रसाद खाण्याची वेळ आली.
कोरोनामुळे सध्या संचारबंदी सुरू आहे. त्यात जिवनावश्यक वस्तू घेण्यासाठी तसेच अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघण्याची सशर्त परवानगी प्रशासनाकडून मिळाली आहे. मात्र काही महाभाग त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहे. रविवारी 29 मार्च रोजी लोकांनी भाजी मंडई व जत्रा मैदानात अक्षरश: धिंगाणा घालत संचारबंदी व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला.
रविवारी संध्याकाळी पोलिसांनी बाईकने अनावश्यक फिरणा-यांवर कारवाई केली. यात त्यांनी सुमारे 50 वाहनं जप्त केले. मात्र त्यानंतरही लोकांचे अनावश्यक बाहेर पडणे कमी झाले नव्हते. अखेर पोलीस प्रशासनाचा संयम सुटला व त्यांनी कठोर भूमिका घेत अनेकांबाबत ‘दे बत्ती’ची भूमिका आज घेतली. आज दुपारपर्यंत काहींना पोलिसांचा प्रसाद मिळाल्याची माहिती ‘वणी बहुगुणी’ला मिळाली आहे.
सकाळ, संध्याकाळ चहलपहल, दुपारी सन्नाटा
दुपारी जरी शहरात सन्नाट दिसून येत असला तर सकाळी व संध्याकाळी नागरिकांची रस्त्याने चहलपहल सुरु असते. त्यामुळे संचारबंदी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. अनेक नागरिक रात्रीच्या वेळी रस्त्याने फिरताना दिसून येतात. संचारबंदीतही काहा कुटुंब रात्रीच्यावेळी रस्त्याने फिरण्याचे आपले नित्यनियम मोडत नसल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांनी आजपर्यंत कठोर भूमिका न घेतल्यानेच काही महाभाग त्याचा गैरफायदा घेत होते.
संचारबंदीत लोक ऐकत नसेल तर दंड्यांच्या वापर करा असा आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिला होता. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला होता. त्यात काही कामानिमित्त तसेच किराणा सामान घेऊन जाणा-यांनाही पोलिसांचा मार पडल्याने पोलीस प्रशासनावर टीकाही झाली होती.
सुरुवातीला वणीकरांनी संचारबंदीला चांगला प्रतिसादही दिला होता. त्यामुळे वणीमध्ये पोलिसांनी मवाळ भूमिका घेतली होती. मात्र काहींच्या अतिउत्साहीपणामुळे सोशल डिस्टन्सिंगचा व संचारबंदीचा फज्जा उडताना दिसत होता. अखेर पोलिसांचा संयम सुटत पोलिसांवर दंडे उगारण्याची वेळ आली आहे. आता तरी यातून अनावश्यक फिरणा-यांनी बोध घेण्याची वेळ आली आहे.