विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नये: ठाणेदार शाम सोनटक्के
पोलीस वर्धापन दिनानिमित्त लो.टि. महाविद्यालयात विद्यार्थांचे समुपदेशन
जितेंद्र कोठारी, वणी: जीवनातील एक छोटीशी चूक आपले उभे आयुष्य बरबाद करु शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाईट मार्गाने न जाता योग्य मार्गाची निवड करावी. तरुण वयातील मुलांनी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे न वळता समाजामध्ये चांगला आदर्श निर्माण करावा. असे प्रतिपादन वणीचे ठाणेदार सपोनि शाम सोनटक्के यांनी व्यक्त केले.
पोलीस वर्धापन दिनानिमित्त स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये आयोजित समुपदेशन कार्यक्रमात ते बोलत होते. देशसेवा ही देशप्रेम तत्व विद्यार्थ्यांनी जोपासले पाहिजे. तारे जमीन पर, जो जीता वही सिकंदर असे चांगले सिनेमा पाहून त्यातून उध्दबोधन घ्यावे. असेही मत ठाणेदार सोनटक्के यांनी मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी आजच्या घडीला बेरोजगारी एक मोठी समस्या आहे त्यामुळे इतरत्र लक्ष न घालता स्वतःचे जीवन घडविण्याकरीता लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी अपयशाला खचून न जाता नव्या उमेदीने, जिद्दीने अभ्यासाला लागले पाहिजे असे मार्गदर्शन केले.
लो.टि. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. सुनील पावडे यांनीही विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. आनंद हूड यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. प्रसन्न जोशी यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच सर्व प्राध्यापक वृंद व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा:
Comments are closed.