पोलीस विभागातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन

0

विवेक तोटेवार, वणी: स्वर्गातून एक स्त्री-पुरुष या धरतीवर आले. त्यापासून पूर्ण मानव जातीची निर्मिती झाली आहे. त्यामुळे आपण सारे मानव एकाच आई वडिलांचे अपत्य आहोत. या देशात प्रत्येक जाती धर्माचे लोक इतर देशांच्या तुलनेत खूप सुरक्षित आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी बंधुभावाने राहावे असे आवाहन वणी पोलीस विभागातर्फे आयोजित इफ्तार पार्टीत मौलाना हाफिज सईद अन्सारी यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव हे होते. व्यासपीठावर मौलवी हाफिज सईद अन्सारी, मौलवी सद्दाम हुसेन, वणीचे उपविभागीय अधिकारी विजय लगारे, पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, तहसीलदार रविंद्र जोगी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजन ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी केले. याप्रसंगी बोलताना मौलवी सद्दाम हुसेन म्हणाले की, ज्या व्यक्तीच चारित्र्य, स्वभाव चांगलं ती व्यक्ती चांगली. प्रत्येक व्यक्तीमध्ये माणुसकी असणे अतिशय आवश्यक आहे. पोलीस अधिकारी विजय लगारे म्हणाले की, या परिसरात सर्व जाती धर्माचे लोक सण उत्सव बंधू भावाने साजरा करतात. असे सण व उत्सव पोलीस मुक्त सण साजरे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषण करताना अमरसिंग जाधव म्हणाले की, उपवास हा सर्व धर्माचा समान भाग आहे. पवित्र रमजान महिन्यात उपवास केल्याने मन व शरीराची शुद्धी होऊन संतुलन राखल्या जाते. त्यामुळे या महिन्याला मुस्लिम समाजात अधिक महत्व आहे. या कार्यक्रमाचे संचालन रवी साल्पेकर यांनी केले. आभार सहायक पोलिस निरीक्षक पडघन यांनी केले. या कार्यक्रमाला हिंदू व मुस्लिम समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.