आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांची धाड

3 आरोपींना अटक, सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

जितेंद्र कोठारी, वणी: आयपीएल क्रिकेट बॅटिंगवर जुगार खेळत असताना वणी पोलीस डीबी पथकाने रविवारी रात्री धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालली. तेथून 3 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 9 लाख 70 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सैयद मिनाज सैयद मुमताज (31), जमशेद हुसेन राशीद हुसैन (23) व मंगल विठ्ठलराव खाडे (32) असे आरोपीचे नाव असून त्यांना पोलिसांनी त्यांना अटक केली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून डीबी पथकाने वणी मुकूटबन मार्गावरील इंदिरा सहकारी सूत गिरणीच्या मागे शिरगिरी शिवारात सट्टा चालत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डीबी पथकांनी त्या ठिकाणी रविवारी रात्री धाड टाकली. त्याठिकाणी एका कारमध्ये बसून तीन जण अबुधाबी येथे खेळत असलेल्या आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्द सनरायजर्स हैद्राबाद (SRH) 20-20 क्रिकेट सामन्यावर मोबाईल द्वारे बॅटिंग जुगार खेळताना आढळले.

पोलिसांना आरोपींकडून रोख 1250 रुपये, 8 मोबाईल हँडसेट किंमत 69000 रु., जुगार खेळत असलेलं कागद,पेन, पेड तसेच एक क्रेटा कार (MH29-BC 2346) किंमत 9 लाख असे एकूण 9,70,000 रु. चा मुद्देमाल जप्त केले.

पोलिसांनी आरोपी सैयद मिनाज सैयद मुमताज (31), रा. शास्त्रीनगर वणी, जमशेद हुसेन राशीद हुसैन (23) रा. मोमीनपुरा वणी व मंगल विठ्ठलराव खाडे (32) रा.मंगलम पार्क चिखलगाव विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) व भा.द.वि. कलम 269, 188 अनव्ये गुन्हा दाखल केले.

सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात पो.नि. वैभव जाधव, डीबी पथकाचे पोउनि गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सुदर्शन वानोळे, रत्नपाल मोहोड, पंकज उंबरकर, अमित पोयाम, दीपक वांडर्सकर यांनी पार पाडली.

अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींचा बेटिंगमध्ये सहभाग

आयपीएल क्रिकेट सामन्यावर वणीत मोठ्या प्रमाणावर बॅटिंग जुगार सुरू असल्याबाबत यापूर्वीही वणी बहुगुणी यांनी बातम्या प्रकाशित केली होती. यात परिसरात रोजची कोट्यवधींची उलाढाल होते. अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींचे कोट्यवधी रुपये यात बुडाले आहे. तसेच अनेक प्रतिष्ठीत व्यक्तीही बेटिंगमध्ये बुकी म्हणून कार्यरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.