वेकोलि विरुद्ध बांधकाम विभागाची तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार
बांधकाम अभियंत्यांची अखेर इमेल व रजिस्टर्ड पोस्टाद्वारा तक्रार... वेकोलि घोन्साने विना परवाना रस्ता खोदून नुकसान केल्याचा आरोप
जितेंद्र कोठारी, वणी: बांधकाम विभागाच्या मालकीचा राज्य महामार्ग विना परवाना खोदून नुकसान केल्याबाबत पोलिसात लेखी तक्रार द्यायला गेलेले कनिष्ठ अभियंता यांच्याकडून तक्रार घेण्यास वणी पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी इमेल व रजिस्टर्ड पोस्टाद्वारे पोलीस विभागात तक्रार पाठविली आहे.
प्राप्त माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणी अंतर्गत झरी, घोन्सा, वणी या मार्गावर किमी 39/800 ते 40/200 मध्ये वेकोलि प्रशासनाने अनधिकृतरित्या रस्ता खोदून नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहात बदल केला. परिणामी दि. 10 व 11 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी राज्यमार्गावर साचून 8 तास वाहतूक बंद झाली. वेकोलिच्या मनमानी कारभारामुळे एक किलोमीटरच्या रस्त्याचे नुकसान झाले. तसेच शेकडो हॅक्टर शेतजमिनीवरील उभे पीक पाण्यात बुडाली.
दि. 12 जुलै रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी वेकोलि महाप्रबंधक यांना पत्र पाठवून सदर राज्यमार्गाच्या सेंटर पासून 15 मीटर अंतरावर नाला काढून तसेच रस्त्याच्या बाजूने काँक्रीटची सुरक्षा भिंत बांधण्याचे आदेश दिले. मात्र वेकोलिने नुकसान झालेल्या रस्त्यावर ओबी मटेरियल व मुरूम टाकून थातुरमातुर दुरुस्ती केली.
सा.बां. विभागाच्या मालकीच्या रस्ता खोदुन तब्बल 1 कोटींचे नुकसान केल्याबाबत सब एरिया मॅनेजर व वेकोलि अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार घेऊन कनिष्ठ अभियंता खडसे हे वणी पोलीस ठाण्यात गेले. मात्र ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग यांच्या सह्यानिशी असलेली तक्रार घेण्यास नकार दिला.
एवढंच नाही तर हा रस्ता तुमच्या मालकीचा आहे याचा काही पुरावा आहे का? तक्रारीत गैर अर्जदाराचे नाव व वय का नाही लिहिले. असे उलट प्रश्न विचारले. शेवटी पोलिसांनी तक्रार घेण्यास स्पष्ट नकार देत अभियंता खडसे यांना परत पाठवले.
प्रत्यक्ष तक्रार घेण्यास नकार दिल्याने अखेर कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग यांनी इमेल व रजिस्टर्ड पोस्टमार्फत पोलीस ठाण्यात तक्रार पाठविली. प्रत्यक्ष तक्रार न घेणारे वणी पोलीस पोस्टाने पाठविण्यात आलेल्या तक्रारीवर कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.