संभ्रम: वणी पालिकेची प्रभाग रचना अखेर रद्द

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रामुळे चर्चेला विराम

जितेंद्र कोठारी, वणी: राज्य शासनाने मंजूर केलेल्या नव्या कायद्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुकीसाठी केलेली सुधारीत प्रभाग रचना रद्द झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, आर्णी, दिग्रस, घाटंजी, दारव्हा, पुसद व उमरखेड नगरपरिषद मुख्याधिकारी याना पत्र पाठवून सूचित केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर वणी नगर परिषदेसाठी जाहीर करण्यात आलेली प्रभाग रचनाही रद्दबातल ठरणार आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेली प्रभाग यादीमुळे शहरात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. वंचित बहुजन आघाडी यांनी निषेध नोंदवित प्रभाग यादीची होळी केली होती.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील सुधारणे अन्वये प्रभाग रचना आता राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने राज्य शासनाने करावयाची आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरु करण्यात आलेली प्रभाग रचनेची पुढील कार्यवाही यापुढे अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात यावी, असे कळविण्यात आले आहे. 
त्यामुळे राज्य शासन नव्याने प्रभागांची रचना करते अथवा आहे तीच कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओबीसी आरक्षणशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. विरोधीपक्ष भाजपचीही हीच भूमिका असल्याने राज्य सरकारने प्रभागांची रचना आणि निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे अधिकार देणारा कायदा केला आहे. 

Comments are closed.