ट्रकची दुचाकीला जबर धडक, वेकोलि कर्मचा-याचा मृत्यू

वणीहून गावी परत जाताना मानकीजवळ अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-मुकुटबन रोडजवळ मंगलवारी एका दुचाकीला ट्रकने भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. किशोर महादेव झाडे असे मृतकाचे नाव असून ते पेटूर येथील रहिवाशी होते व वेकोलित कार्यरत होते. रात्री नागपूर येथे उपचारासाठी नेताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे की किशोर महादेव झाडे (41) हे तालुक्यातील पेटूर येथील रहिवाशी होते. ते वेकोलिच्या निलजई खाणीत नोकरीला होते. मंगळवारी दिनांक 15 मार्च रोजी ते कामानिमित्त त्यांच्या दुचाकीने पेटूरहून वणीत आले होते. दुपारी काम आटपून ते गावी परत जात होते. 12.30 वाजताच्या सुमारास वणी कायर रोडवरील मानकी गावाजवळील मुकुटबनच्या दिशेकडून येणा-या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अपघातात किशोर हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याने ट्रक चालक गाडी वळवून मुकुटबनच्या दिशेने पळून गेला. अपघात झाल्याचे कळताच काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. संध्याकाळी त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना नागपूर येथे हलवण्यात येत होते. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

किशोरच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आपला एक सहकारी गेल्याने वेकोलि कर्मचा-यांमध्येही शोककळा पसरली आहे. किशोर यांच्यावर आज दुपारी पेटूर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Comments are closed.