कोणता प्रभाग राहणार राखीव? कोणता प्रभाग सर्वात मोठा व सर्वात लहान?

प्रभाग रचनेवर 17 मार्चपर्यंत घेता येणार आक्षेप.... शासनाच्या 'या' निर्णयामुळे पुन्हा प्रभागरचना होण्याची शक्यता...

जब्बार चीनी, वणी: वणी नगरपरिषद निवडणुकीसाठी नुकतीच सुधारीत प्रभाग यादी जाहीर करण्यात आली आहे. नव्याने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार वणी नगरपरिषदमध्ये 14 प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी वणी नगरपरिषद मध्ये 13 प्रभाग अस्तित्वात होते. एक प्रभाग वाढल्याने आता 3 आणखी नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. आता 29 नगरसेवक राहणार आहेत. तसेच प्रभागारचनेबाबत नागरिकांना आक्षेप आणि हरकती असल्यास त्यांना 17 मार्च पर्यत मुख्याधिकारी वणी यांच्याकडे आक्षेप नोंदवता येणार आहे.

नवीन प्रभाग रचनेत सर्वात मोठा प्रभाग हा प्रभाग क्रमांक 14 राहणार आहे. यात तीन नगरसेवक राहणार आहेत. तर सर्वात लहान प्रभाग हा प्रभाग क्रमांक 10 राहणार आहे. प्रभाग क्रमांक 4, 5, 6 आणि 12 मध्ये अनुसुचीत जातीच्या मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यातील प्रभागात दोन पैकी एक जागा ही मागासवर्गीयांसाठी राखीव राहू शकते. तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये अनुसुचित जमातीची संख्या अधिक असल्याने हा प्रभाग अनुसुचित जमातीसाठी राखीव राहू शकतो.

गल्ली व रोडचा प्रश्न कायम
प्रभाग रचनेत याही वेळी काही गल्ली व रोडची एक बाजू एका प्रभागात तर दुसरी बाजू दुस-या प्रभागात आली आहे. अशा रोड आणि गल्लीचे काम करण्यासाठी दोन्ही प्रभागाचे नगरसेवक उदासिन असतात व एकमेकांवर कामे ढकलतात. त्यामुळे असे रस्ते व गल्लीचा विकास खुंटल्याचे दिसून येते. ढुमेनगर ते हनुमान मंदीर हा रस्ता ही असाच अडकला होता. दोन्ही प्रभागाच्या नगरसेवकांनी या रस्त्त्याच्या डांबरीकरणाचे काम एकदुस-यावर ढकलले होते. अखेर भागातील इतर दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंटीकरण झाले व हा रहदारीचा रस्ता मात्र तसाच राहिला. आता हा रस्ता आमदार निधीतून होणार असल्याची माहिती आहे.

अनेक प्रभागाची प्रभागाची सीमा वाढली
प्रभाग क्रमांक 1 चा काही भाग आता प्रभाग क्रमांक 4 झाला आहे. जैताई नगर लक्ष्मीनगर पासूनचा परिसर आता थेट रेल्वे स्टेशनपर्यंत गेला आहे. अनेक प्रभागाची सीमा लांबलचक झाल्याने गोंधळ उडण्याची शक्यता आहे. शिवाय नगरसेवकांसाठी इतका मोठा प्रभाग सांभाळण्यासाठी दमछाक होणार आहे. शिवाय याचा परिणाम विकास कामावर होऊ शकतो.

नागरिकांना 17 मार्चपर्यंत घेता येणार आक्षेप
प्रभाग रचना यादीत कोणत्याही प्रकारची आक्षेप किंवा हरकती असेल तर 17 मार्च पर्यंत नागरपरिषद प्रशासनाकडे आक्षेप नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र प्रभाग निर्मितीचे अधिकार आता राज्य शासनाने आपल्याकडे घेतल्यामुळे वणी नगरपरिषद हद्दीत प्रभागाची पुनर्रचना होणार की जाहीर यादीप्रमाणेच राहणार हे निश्चित नाही.

पुन्हा प्रभाग रचना होणार का?
प्रभाग रचना ठरविणे व त्याची हद्द निश्चित करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे देणारे विधेयक सोमवारी एकमताने विधिमंडळात मंजूर करण्यात आले. या हक्कान्वये राज्य शासनाने पुन्हा प्रभाग रचना केल्यास यात आणखी वेळ जाणार. ओबीसीना राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी राज्य शासनाने विधेयक आणले आहे. तसेच पुन्हा प्रभाग रचना झाल्यास यात आणखी वेळ जाणार असल्याचे दिसत आहे.

हे देखील वाचा:

सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडिया रविवारी वणीत

आता तुमच्या लहान बाळाची सर्व शॉपिंग एकाच छताखाली

मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली… अन् घरी परतलीच नाही

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.