बहुगुणी डेस्क, वणी: 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना तिकीट देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा पक्ष प्रवेश केला. मात्र त्यानंतर काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले गेले. याचे सर्वसामान्य मतदारांमधून तीव्र पडसाद उमटले. अखेर काँग्रेसला याची दखल घ्यावी लागली व बाळू धानोरकर यांना तिकीट द्यावी लागली. पुढे ते विजयी देखील झाले. मात्र यावेळी काँग्रेस पुन्हा तिच चूक परत करीत आहे. सध्या चंद्रपूर मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकर त्यांचे तिकीट कापून इतरांना तिकीट देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे कळताच त्यांच्या समर्थनात एक पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. यात काँग्रेसने गेल्या वेळी केलेली चूक पुन्हा करू नये असे आवाहन करत काँग्रेसची तिकीट प्रतिभा धानोरकर यांनाच द्यावी अशी मागणी केली आहे. परिसरातील प्रतिभा धानोरकर यांचे समर्थक नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टमध्ये काय लिहिले आहे ?
काँग्रेस पक्षाला जाहीर आवाहन,
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने स्व. बाळूभाऊ धानोरकर यांचे आधी तिकीट कापले होते. मात्र पुढे बाळूभाऊंनी विजय मिळवला व चंद्रपूर मतदारसंघ ही काँग्रेसची महाराष्ट्रातील एकमेव जागा ठरली. ही चूक वेळीच दुरुस्त झाली नसती तर मराहाष्ट्रात पक्षाचे खाते देखील उघडले नसते. त्यामुळे गेल्या वेळी सुरुवातीला केलेली चूक काँग्रेसने पुन्हा करू नये. असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना नम्रपणे जाहीर आवाहन आहे.
चंद्रपूर मतदारसंघासाठी प्रतिभाताई धानोरकर यांच्यापेक्षा दुसरा कोणताही सक्षम उमेदवार नाहीत. गेल्या काही काळांपासून प्रतिभाताई या चंद्रपूर लोकसभेच्या तयारीला लागल्या आहेत. त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. दांडगा जनसंपर्क, मनमिळावून स्वभाव, तळागाळातील लोकांशी थेट मिसळणे इत्यादी कारणांसाठी प्रतिभाताई या मतदारसंघात लोकप्रिय आहेत.
काही महिन्याआधी खासदार स्व. बाळू धानोरकर यांचे दु:खद निधन झाले. पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार व तडफदार नेत्याचा दुर्दैवी मृत्यू केवळ पक्षाचे कार्यकर्ते, नेते किंवा समर्थकच नाही तर सर्वसामान्य जनतेलाच्याही मनाला चटका लावून गेला. या दु:खातून मतदारसंघातील लोक अद्यापही सावरले नाहीत. त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार या जागेवर प्रतिभाताई यांचा पहिला हक्क आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी सर्वसामान्य मतदारांची तीव्र इच्छा आहे.
यावेळी भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे तिकीट दिले आहे. एका कॅबिनेट मंत्रीविरोधात एक सक्षम उमेदवार देणे पक्षाने गरजेचे आहे. जातीय समिकरणे, सहानुभूतीची लाट, स्वच्छ प्रतिमा, सर्व जातीधर्मातील लोकांचे समर्थन इत्यादी कारणांमुळे प्रतिभाताईं पेक्षा दुसरा कुणी सक्षम उमेदवार राहू शकत नाही.
फक्त एका मतदारसंघापुरते वर्चस्व असलेले उमेदवार, बाहेरील मतदारसंघातील आयात उमेदवार किंवा केवळ सोशल मीडियातून इमेज बिल्डिंग करून ग्राउंडलेव्हलवर कुठलाही जनसंपर्क नसणारे उमेदवार हे पक्षासाठी सक्षम उमेदवार राहू शकत नाही. प्रतिभाताई धानोरकर या संभाव्य उमेदवार राहणार अशी चर्चा झाल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सर्व कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक इतकेच नाही तर सर्वसामान्य लोकही कामाला लागले आहे. त्यामुळे मतदारसंघात प्रतिभाताईंचा विजय निश्चित मानला जात आहे.
या सर्व गोष्टींचा काँग्रेसने गंभीरपणे विचार करावा. गेल्या वेळी आधी काँग्रेसने जी चूक केली होती ती पुन्हा करू नये. यात केवळ काँग्रेस पक्षाचे नाही, तर जो सर्वसामान्य मतदार मोदीलाटेत काँग्रेसकडे आशेने पाहतोय. त्याच्यावरही हा अन्याय ठरेल. प्रतिभाताई या विनिंग उमेदवार आहे. त्यामुळे पक्षाने त्यांनाच तिकीट द्यावी, अशी नम्र विनंती आहे.
आपला
चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील
एक सर्वसामान्य मतदार
(आपण या आवाहनाशी सहमत असल्यास, खाली आपले नाव टाकून ही पोस्ट अधिकाधिक व्हायरल करावी.)
Comments are closed.