बहुगुणी डेस्क, वणी: बुधवारी वणीतील रेस्ट हाऊस समोर असलेल्या ज्योती किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानावर छापा टाकण्यात आला. यात सुमारे 30 हजारांचा प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी दुकानमालक मनीष नंदकिशोर फेरवानी (वय 39, रा. सिंधी कॉलनी, गुरुनानक नगर, वणी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणीतून रोज लाखोंचा प्रतिबंधित तंबाखू मजा, गुटखा, सुगंधी सुपारी इत्यादी मालाचा सप्लाय होतो. वणीत अनेक ठिकाणाहून याची विक्री होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन इतर ठिकाणी कधी धाड मारणार असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व – औषध प्रशासन, यवतमाळच्या सीमा रामसुरकर यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जप्त साठ्यात विविध ब्रँडचे सुगंधित तंबाखू व पानमसाला, तसेच स्वीट सुपारी आढळून आली. प्रतिबंध असूनही ही उत्पादने विक्रीसाठी साठवण्यात आली होती.
प्राथमिक चौकशीत या उत्पादनांचा वापर आरोग्यास अत्यंत घातक असून कर्करोगासारखे आजार होऊ शकतात, हे माहीत असतानाही आरोपीने केवळ वैयक्तिक फायद्यासाठी साठवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व २०११ व भारतीय न्याय संहिता कायद्यांच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
इतर ठिकाणी धाड कधी?
वणीत मोठ्या प्रमाणात खर्र्याची विक्री होते. त्यामुळे वणीत मोठ्या प्रमाणात मजा या प्रतिबंधित तंबाखूची राजरोसपणे विक्री होते. सिंधी कॉलोनी, विराणी टॉकीज, मुख्य मार्केट, तुटी कमान इत्यादी भागात अनेक दुकाने प्रतिबंधित तंबाखूची विक्री करतात. एकावर कारवाई झाली आहे. मात्र इतरांवर कधी कारवाई होणार, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
Comments are closed.