पुरुषोत्तम नवघरे, वणी: इंटरनेट लावण्यासाठी शिंदोला येथे गेलेल्या एका कर्मचा-याने दुचाकी पंक्चर झाल्याने सावंगी येथे रस्त्याच्या कडेला लावली होती. मात्र सदर मोपेड चोरीला गेली होती. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी आता दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. गोपाल महादेव तुमराम (28) असे आरोपीचे नाव असून तो वणी तालुक्यातील शेवाळा येथील रहिवासी आहे.
शिरपूर येथील ठाणेदार माधव शिंदे हे बुधवारी दिनांक 18 जून रोजी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना खबरीकडून शेवाळा ता. वणी येथील एक इसम चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोउपनि रावसाहेब बुधवंत व पोहवा प्रशांत झोड हे कार्यवाहीसाठी गेले. त्यांनी आरोपीला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. शेवाळा येथे राहणा-या गोपालकडे बनावट ग्राहक पाठवला. आरोपीने ग्राहकाला दुचाकी दाखवली. सदर दुचाकी चोरीची असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी गोपाल महादेव तुमराम याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याजवळून होन्डा कंपनीची ऍक्टिव्हा ही मोपेड (MH49- BP-0287) जप्त केली.
कशी झाली होती मोपेड चोरी?
अमन अनिल निमगळे (28) हा मुळचा नागपूर येथील रहिवासी असून तो मारेगाव येथील जिओ स्टोअऱमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करतो. त्याच्याकडे होन्डा कंपनीची ऍक्टिव्हा (MH49- BP-0287) ही दुचाकी आहे. कंपनीच्या कामासाठी तो ही मोपेड वापरतो. दिनांक 27 मे रोजी तो दुपारी 1 वाजताच्या सुमारास टेक्निशिअनला सोबत घेऊन तो दुचाकीने शिंदोला कॉलोनी येथे वायफाय जोडण्यासाठी गेला होता.
दरम्यान रस्त्यात त्याला दुचाकी पंक्चर झाल्याचे लक्षात आले. दरम्यान मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे त्याने दुचाकी सावंगी (नवीन) गावाजवळील रस्त्याच्या कडेला लावली. त्यानंतर कस्टरमला बोलवून ते दोघेही दुपारी 4 वाजताच्या सुमारास कस्टमरच्या दुचाकीने शिंदोला येथे गेले. वायफाय लावल्यानंतर रात्री 8 वाजताच्या सुमारास ते दोघेही दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी परत आले. मात्र अमनला त्याची दुचाकी आढळली नव्हती.

ही कारवाई एसडीपीओ गणेश किन्द्रे, एलसीबीचे पीआय सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे सहायक पोलिस निरीक्षक माधव शिंदे, पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब बुधावंत, प्रशांत झोड, सुनील दुबे, मंगेश सलाम यांनी केली.



Comments are closed.