सावधान… विनामास्क फिरणा-या 64 व्यक्तींवर कार्यवाही

500 रुपयांचा दंड, आज 32 हजारांचा दंड वसूल

0

विवेक तोटेवार, वणी: जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी शनिवारी रात्री विनामास्क फिरणा-यांवर 500 रुपये दंड आकारण्याचे आदेश दिलेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात आज पोलीस विभागातर्फे विनामास्क फिरणा-या 64 महाभागांवर कार्यवाही करण्यात आली. त्यांच्यावर 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. जर हीच व्यक्ती दुस-यांदा विनामास्क आधळली तर त्या व्यक्तींवर फौजदारी गु्न्हा दाखल केला जाणार आहे.

विनामास्क फिरणा-या व्यक्तींवर कार्यवाही करण्यासाठी पोलीस विभागातर्फे टीम तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागातील कर्मचारी व डीबी पथकातील कर्मचारी चौका चौकात उभे राहून विनामास्क फिरणा-या व्यक्तींकडून दंड आकारत आहे. या आठवड्यात वणीत विनामास्क फिरणाऱ्या 371 जणांवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून एकूण 93 हजार 400 रुपये एकूण दंड वसूल करण्यात आला आहे. यात 307 जणांकडून 200 प्रमाणे  61 हजार 400 रुपये दंड तर 64 जणांकडून 500 प्रमाणे 32000 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

सुरुवातीला विनामास्क फिरणा-या व्यक्तींकडून 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात येत होता. मात्र शनिवारी आलेल्या नवीन आदेशानुसार आज दंडाची रक्कम वाढवून 500 रुपये केली आहे. आज कार्यवाही झालेल्या व्यक्तींकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शिवाय एकच व्यक्ती दुस-यांदा विनामास्क आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. विनामास्क आढळलेल्या व्यक्तींवर भादंविच्या कलम 279 नुसार दंड आकारण्यात आला आहे.

मास्क लावूनच घराबाहेर पडा – वैभव जाधव
सध्या शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. विनामास्क फिरणा-या व्यक्तींकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. दंड वसूल केला जातोय म्हणून मास्क लावून फिरू नका तर स्वत:ची काळजी घेण्यासाठी मास्क लावा. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावूनच घराबाहेर पडा. ही कार्यवाही यापुढेही रोज सुरूच राहणार आहे.
– वैभव जाधव, ठाणेदार वणी पोलीस स्टेशन

सदर कारवाई ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निखिल फटींग, माया चाटसे, पोउनि गोपाळ जाधव, पोउनि प्रताप बाजड यांनी केली. सध्या तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढूनही याचा वणीकरांवर काहीही फरक पडलेला नाही. यापुढे दंडाच्या रकमेच्या भितीने तरी वणीकर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.