जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड कामाला अवैध रेतीचा पुरवठा

राजकीय नेत्याची चार ब्रास रेती केली जप्त

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथे खनिज विकासनिधीतून जिल्हा परिषद शाळेच्या कंपाउंडचे काम सुरू आहे. बांधकामाकरिता ठेकेदाराला बिना रॉयल्टी म्हणजेच अवैधरीत्या चार ब्रास रेती टाकण्यात आली. ही गुप्त माहिती महसूल विभागपर्यंत पोहचली. तलाठी मुंजेकर ५ वाजता दरम्यान येदलापूर येथे पोहचले. त्यांनी चार ब्रास रेती साठ्याचा पंचनामा गावकऱ्यासमोर केला व रेती पोलीस पाटील यांना सुपूर्त नाम्यावर दिली.

यावरून तहसीलदार यांना रे2ती साठ्याबाबत विचारणा केली असता चारही ब्रास रेती जप्त केल्याचे सांगितले. अवैध रेती देणारा एक राजकीय पुढारी असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर यापूर्वीदेखील रेतीतस्करीसाठी कारवाई झाल्याचे कळते. अनेकदा अवैध रेती तस्करीमध्ये त्यांचे ट्रॅक्टर जप्त करून पोलीस व महसूल विभागाने कार्यवाही केली आहे. परंतु अजूनही रेती चोरी बंद केली नसल्याने जनतेत वेगळीच चर्चा आहे.

चार ब्रास रेतीसाठ्याचा पंचनामा होताच राजकीय हालचाली सुरू झाल्यात. रेती तस्करी व जप्त केल्याची माहिती माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष विश्वास नादेकर यांना मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करून तक्रार केली. सदर रेती चोरट्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली.

तालुक्यात अनेक ठेकेदार तेलंगणातील आनंतपूर येथून ट्रक व ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक करून गरजू लोकांना बेभाव किमतीने विकतात. लाखों रुपये दर दिवसाला कमवीत आहे. ही रेती तस्करीसुद्धा बंद करण्याकरिता नांदेकर व शिवसैनिक सरसावलेत. तालुक्यातील सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झालेत. येदलापूर येथील शाळेत अवैधरीत्या रेती टाकणारा रेती चोरटा हा आपल्या शेतात रेतीसाठा करून ठेवत असल्याची चर्चा आहे.

रेती तस्कर परिसरात शेतातील व मुख्य मार्गावरील नाल्यातील रेती काढतो. पाच हजार ते सात हजार ब्रास प्रमाणे विक्री करीत असल्याचीसुद्धा माहिती आहे. तरी सदर रेती चोरट्यावर कायदेशीर कार्यवाही न केल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.