जब्बार चीनी, वणी: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या अमानवीय घटनेचे पडसाद आज वणीतही पाहायला मिळाले. अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणा-या आरोपींवर तत्काळ कठोर कारवाई करून कर्त्यव्यात कसूर करणाऱ्या उ प्र पोलिसांवर ताबडतोब कारवाई करा अशा मागणीचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आली. याबाबत पक्षातर्फे आज गुरूवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले.
उ प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीवर झालेली ही घटना निर्दयी व अत्यंत घृणास्पद व अमानवीय आहे. अत्यंत गरीब दलित परिवारातील मुलीने पोट भरण्यासाठी शेतातील काम करताना घडलेली ही घटना सरंजामशाही प्रवृत्तीची आहे. उच्च वर्णीय असलेल्या नरभक्षकांनी सामूहिक बलात्कार करून तिच्या शरीराच्या हाडे तोडून जीभ छाटून अमानुषपणे हत्या केली आहे. घटना घडल्यानंतर ५ दिवसांपर्यंत उ प्र पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला नाही. ही घटना उ प्र च्या भाजपच्या योगी सरकारच्या डोळ्यादेखत झाली आहे, त्यामुळे ह्याची नैतिक जवाबदारी ह्या योगी सरकारला घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.
योगी सरकारच्या पोलिसांनी ह्या पीडित मुलीचे प्रेत आपल्या व्हॅन मध्ये टाकून मुलीच्या आई-वडिलांना सुपूर्द न करता परस्पर त्याच गावातील शेतात नेऊन रात्री २ वाजता जाळून टाकले. एवढेच नाही तर तिच्या आईवडीलांना व नातेवाईकांना घरात बंद करून ठेवले. असे काय सत्य होते की उ प्र पोलिसांना लपवायचे होते ह्याची चौकशी होणे गरजेचे आहे. ह्यामुळे उ प्र सरकारच्या पोलिसांवर आणि भाजप योगी सरकार वर संशय निर्माण झाला आहे. असाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष दलित अत्याचाराच्या विरोधात ठाम भूमिका घेत पीडितांच्या पाठीशी उभी आहे. दलितांवर, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माकपतर्फे करण्यात आली. निवेदन देताना कॉ शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, नंदू बोबडे, कीर्तन कुलमेथे, कवडू चांदेकर, संजय वालकोंडे, मनोज काळे, प्रभाकर मडावी, उदेभान आत्राम, शंकर नालमवार आदी उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)