हिलटॉप कंपनीविरोधात तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन

दिवसभर काम ठप्प, स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी

विवेक तोटेवार, वणी: वेकोलिच्या कोळसा खाणीत ओबी डंपिंगचे काम करणाऱ्या हिलटॉप कंपनीत स्थानिक कामगारांवर अन्याय केला जात आहे. बाहेरून आणलेल्या कामगारांना 30 दिवस काम दिले जात आहे, तर स्थानिकांना केवळ 18 दिवस काम दिले जात आहे, असा आरोप करीत याविरोधात मंगळवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. कंपनीच्या धोरणाविरोधात दिवसभर कोलार पिंपरी खाण बंद पाडण्यात आली. त्यामुळे खाणीतील उत्पादन ठप्प झाले.

दुपारी १२ वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळपर्यंत सुरूच होते. दरम्यान कंपनीतील अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. परंतु सायंकाळपर्यंत कोणताही निर्णय झाला नव्हता, निर्णय न झाल्यास हे आंदोलन कायम राहील, असे तारेंद्र बोर्डे यांनी सांगितले. हिलटॉप कंपनीत जवळपास 70 स्थानिक युवा कामगार हेल्पर म्हणून काम करतात. त्यांना केवळ 18 दिवस काम दिले जाते. किमान 26 दिवस काम द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बंडू चांदेकर, कोलार पिंपरीचे सरपंच अतुल बोंड, निळापूरचे अनिल बोढाले, ब्राम्हणीचे उपसरपंच बाळू खामनकर यांच्यासह हिलटॉप कंपनीतील कामगार सहभागी झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Comments are closed.