शेतकरी, कष्टक-यांच्या हाती सत्ता देणे हीच कॉ. दानव यांना आदरांजली – कॉ. किसन गुजर

वणीत कॉ. शंकर दानव यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: कॉ. शंकरराव दानव हे जीवनातील ६० वर्षे शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी खांद्यावर लाल झेंडा घेऊन सातत्याने संघर्ष करीत राहिले. भांडवलदारी व्यवस्थेमध्ये शेतकरी व श्रमजीवी वर्गाला संपूर्ण न्याय मिळणे कठीण आहे. म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्वात शेतकरी व श्रमिकांना एकत्र करीत हा संघर्ष गतिमान करीत राहिले. शेतकरी, श्रमिकांच्या हातात सत्तेची सूत्र यावे व समाजवादी व्यवस्थेची सत्ता प्रस्थापित व्हावी हेच स्वप्न उराशी बाळगून ते आंदोलन करत होते, आता त्यांचा पश्चात ते स्वप्न पूर्ण करण्याची जवाबदारी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची आहे व ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी सातत्याने संघर्षासाठी सज्ज राहावे, असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ. किसन गुजर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतलेल्या श्रद्धांजली सभेत केले.

३१ जानेवारी ला कॉ. शंकरराव दानव यांचे अकस्मात हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले होते. त्या अनुषंगाने बुधवारी दि. 21 फेब्रुवारी रोजी वणी येथील वसंत जिनिग सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली घेण्यात आली. या सभेला काँगेस चे ॲड. देविदास काळे, जयसिंग गोहोकर, संभाजी ब्रिगेड चे अजय धोबे, वसंत जिनिंगचे संचालक प्रमोद वासेकर, माजी नगराध्यक्ष पी.के. टोंगे, प्रा. मोहितकर, संयुक्त किसान मोर्चाचे आनंदराव पानघाटे, शिक्षक संघटनेचे व्ही.बी. टोंगे, भाकपचे कॉ. अनिल घाटे,माकपचे राज्य कमिटी सदस्य कॉ. रमेशचंद्र दहीवडे ( चंद्रपूर), कॉ. सुभाष पांडे (अमरावती), कॉ. अरुण लाटकर, कॉ. मनोहर मुळे (नागपूर), कॉ. यशवंत झाडे( वर्धा), ॲड डी.बी.नाईक आदी प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा यावेळेस मार्गदर्शन केले.

कॉ. अरुण लाटकर यांनी “भांडवलदारी पक्षात व्ययक्तिक लाभासाठी व सत्तेसाठी सकाळी एका पक्षात तर सायंकाळी दुसऱ्या पक्षात अशी कोलांटउडी मारत असताना कॉ . दानव यांनी संपूर्ण जीवन एका पक्षात घालविणे हे एक आश्चर्यच आहे”, असे सांगत ” कॉ. दानव यांनी तीन पिढ्यांचे नेतृत्व केलेले आहे” असे सांगितले. तर कॉ. रमेशचंद्र दहीवडे यांनी सांगितले की,” कॉ. दानव हे मार्क्सवादी विचाराने प्रेरित होते, त्यामुळे त्यांना हे सर्व करण्याची प्रेरणा मिळाली, कार्ल मार्क्स यांनी कष्टकऱ्यांचा शोषणाचे मूळ व त्या शोषणातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितल्याने कार्ल मार्क्स यांना अनेक देशातून हद्दपार करण्यात आले होते, ह्या ओढवलेल्या परिस्थीत मार्क्स ची दोन मुले वारली असतानाही त्यांनी आपला मार्ग सोडला नाही, हाच मार्ग कॉ. दानव यांनी स्वीकारला होता.”

ॲड. देविदास काळे यांनी कॉ. दानव यांच्या जुन्या आंदोलनातील आठवणींना उजाळा दिला तर अजय धोबे यांनी कॉ. दानव यांचा आंदोलनातील वेळेला किंमत व प्रामाणिकपणा सांगितला, कॉ. यशवंत झाडे यांनी खरा नेता कधीच मरत नसतो तर तो चळवळीत अजरामर असतो , हे सांगितले. कॉ. अनिल घाटे यांनी,” देशाची राजकीय व्यवस्था ही हुकूमशाही कडे झुकली असून व्यक्तीचे राजकीय,आर्थिक व सामाजिक अधिकार संपुष्टात येत आहे, त्यासाठी संघर्ष वाढविणे गरजेचे आहे”, हे मांडले.

पुस्तकांची विक्रमी विक्री
या सभेत लीलाधर आरमोरिकर यांनी लावलेल्या पुस्तकांचा स्टॉल मध्ये मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचां खप झाला. तर असंख्य कार्यकर्त्यांनी कॉ. शंकरराव दानव यांची प्रतिमा विकत घेऊन जनतेसाठी झटणाऱ्या खऱ्या नेत्याची कदर होते हे दाखवून दिले आहे.

या श्रद्धांजली सभेत कॉ.अरुण भेलके यांनी क्रांतिकारी गीत सादर करून उपस्थितांमध्ये जोश जागविला तर संचालन कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी केले व कॉम्रेड शंकरराव दानव हे ध्येयवेडे होते, त्यांनी या परिसरात कृतीतून मार्क्सवाद रुजवीला, शोषण विरहित समाजव्यवस्था स्थापित व्हावी हेचं त्यांचे ध्येय होते. असे ऍड दिलीप परचाके यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले.

या कार्यक्रमाला कॉ.शंकरराव दानव यांची पत्नी कलावती, मुले ॲड.राहुल, मिलिंद व सरिता हे उपस्थित राहून त्यांनी पक्षाला २१ हजाराचा निधी दिला. ही श्रद्धांजली सभेत कॉ. मनोज काळे, देविदास मोहकर, चंद्रशेखर सिडाम,कवडु चांदेकर, नंदू बोबडे, अनिता खूनकर, मनीषा परचाके,मनीष इसाळकर, निरंजन गोंधळेकर, सुधाकर सोनटक्के, गजानन ताकसांडे, सदाशिव आत्राम, रामभाऊ जिद्देवार, किसन मोहुरले, प्रकाश घोसले, संजय वालकोंडे, सुरेखा बिरकुरवार,अनिल सातपुते, स्मिता गेडाम आदी व असंख्य जिल्हाभरातून स्त्री-पुरूष काम्रेड्स उपस्थित होते. त्याच सोबत एके काळी एस एफ आय विद्यार्थी संघटनेत कार्य करणाऱ्या व आज नोकरी वर असणारे मिलिंद साव, कोल्हे, मेश्राम आदी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

Comments are closed.