क्रांतिदिनी 9 ऑगस्टला वणी व पाटणबोरी येथे निदर्शने आणि आंदोलन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने सहभागी होण्याची केली विनंती

0

जब्बार चीनी, वणी: भाजपच्या मोदी केंद्र सरकारकडून लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणावर जनविरोधी निर्णय, धोरणे व कायदे केले जात आहेत. देशातील कष्ट करणारी जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे व्यवसाय करणारा देशोधडीला जात आहे. देशात कधी नव्हती एवढी बेरोजगारी वाढली आहे. कोरोनाच्या नावाखाली संसदेला, विरोधी पक्षांना किंवा जनतेला विश्वासात घेतले जात नाही. जनतेला संघर्षातून मिळालेले अधिकार संपुष्टात आणले जात आहे. आदी कारणांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांतिदिनी वणी व पाटणबोरी येथे सरकारला इशारा देण्याचासाठी हे आंदोलन होत असल्याचं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आले.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज ताबडतोब द्या, घरगुती व कृषिपंपाची वीजबिलं माफ करा, २०२०चे वीज विधेयक रद्द करा, युरियाची कृत्रिम टंचाई दूर करून शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्या, प्रत्येक पिकाला उत्पादन खर्च अधिक ५०% नफा हमिभाव जाहीर करा व हमिभावापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव निम्म्याने कमी करा, लाभार्थ्यांमध्ये वर्गवारी न करता प्रत्येक कुटुंबाला दरमहा 20 किलो धान्य, १ लीटर तेल, १ कि. डाळ, १ कि साखर देण्यात यावी.

केंद्र सरकारच्या मोफत धान्य वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, महसूल, देवस्थान व वनविभागाच्या जमीनींवरील अतिक्रमणधारकांना जमिनीवरून हटविणे व त्रास देणे बंद करा, लॉकडाऊन काळात प्रत्येक कुटुंबाला दरमहा ७५०० ₹ आर्थिक मदत द्या, आदिवासी जनतेला मिळणारी खावटी ताबडतोब द्या, केंद्र सरकारने घेतलेले नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा व ऑनलाइन शिक्षणपद्ध्ती रद्द करा आदी मागण्या ह्या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे.

ह्या आंदोलनात जास्तीतजास्त जनतेने सहभागी होऊन आंदोलनाला यशस्वी करण्याची विनंची कॉम्रेड शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, चंद्रशेखर सिडाम, खुशालराव सोयाम, किसन मोहूर्ले, मनोज काळे, विप्लव तेलतुंबडे, कवडू चांदेकर, सुधाकर सोनटक्के, गजानन ताकसांडे, संजय कोडापे, अशोक येल्लावार, अशोक गेडाम, ऋषी कुळमेथे आदींनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.