केबल व्यावसायिकांनाही फ्रंटलाईन वर्कर्सच्या सोयी सुविधा द्या: सुनील जिवने
जीव धोक्यात घालून वर्षभरापासून अविरत सेवा सुरू
जब्बार चीनी, वणी: गेले वर्षभर महाराष्ट्रात कोरोनाची भयंकर स्थिती आहे . गेल्या वर्षी मोठा लॉकडाऊन झाला. त्याकाळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. आताही महाराष्ट्रत जे निबंध लादले जात आहेत त्यात अत्यवश्यक सेवांना सुरू ठेवण्याचा निर्णय होतोय. यामध्ये केबल व इंटरनेट धारकांना अत्यवश्यक सेवेमध्ये गणले गेले. मात्र त्यात काम करणा-या व्यक्तींना अत्यावश्यक सेवेत येणा-यांच्या कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाही. त्यामुळे केबल व्यावसायिक व टेक्निशियनना फ्रंटलाईन वर्करला ज्या सोयी सुविधा दिल्या जातात त्या सोयी सुविधा द्याव्यात अशी मागणी केबल असोसिएशनचे सुनील जिवने यांनी केली आहे.
कोरोनाच्या काळात सर्व बंद होते मात्र घरोघरी अडकलेल्यांसाठी केबल धारक काम करीत होते. यामुळे लोकांना घरी थांबण्यास कारण मिळाले आणि दुसरे म्हणजे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना केबल धारकांच्या कष्टामुळेच यशस्वी ठरली. आजही लाखो लोक घरुन ऑफिसचे कामे करीत आहेत. वणीत जवळपास 16 ते 17 केबल ऑपरेटर व त्यांचे कडे काम करणारे 70 ते 75 मदतनीस आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून ते इंटरनेट आणि केबलची सुविधा देत आहेत. मात्र त्यांना ना व्हॅक्सिनसाठी कुठली तरतूद करण्यात आली आहे ना इतर कोणत्या शासकीय सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत.
केबल व्यावसायिकांनी आजपर्यंत सरकारला परिसरातून मनोरंजन करातून कोट्यवधींचा कर दिला. आज डीटीएच कंपन्यांनी केबल व्यावसायिकांवर आक्रमण केले आहे. यातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्यवसाय काबीज केला आहे. मात्र याही परिस्थितीत केबल चालक आणि केबल टेक्निशियन लोकांना सेवा देत आहे. महाराष्ट्रातील कित्येक केबलचालकांचा सेवा देताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ज्या ऑपरेटरने इतकी वर्षे सरकारची तिजोरी भरली आज त्याच्याच कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. ज्या नेत्यांची भाषणे नागरिकांपर्यंत ज्यांनी पोचवली त्याच नेतेमंडळींना याचा विसर कसा काय पडला आहे. असा सवाल सुनील जिवने यांनी उपस्थित केला आहे. आज सरकारी यंत्रणेने अशा घटकांना विचारात घेऊन मदत करणे गरजेचे आहे. फ्रंटलाईन वर्कर्सला जसे व्हॅक्सिन आणि इतर सेवा सुविधेत प्राधान्य दिले जात आहे. त्या सोयी सुविधा केबल व्यावसायिक व टेक्निशियनना द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हे देखील वाचा: