पुलवामा शहिदांच्या वीरपत्नींना अमरावतीकरांची ही वेगळी कृतज्ञता…

सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टचा उपक्रम

0

बहुगुणी डेस्क, अमरावतीः वातावरण अत्यंत गंभीर झाले. संपूर्ण हॉल भारावलेल्या अंतकरणाने हा सोहळा अनुभवत होते. हुंदक्यांच्या लाटा भावनांच्या काठांवर आदळत होत्या. वीरपत्नींच्या डोळ्यांतील वीररसात वेदनेची किनार तरळत होती. अमरावतीकरांनी पुलवामा शहिदांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सिंफनी गृप ऑफ म्युझिक, कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टने त्यासाठी ‘द मेलोडियस जर्नी ऑफ किशोर कुमार’ हा कार्यक्रम स्थानिक संत ज्ञानेश्वर सभागृहात केला. ट्रस्टच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमरावतीकरांनी कृतज्ञतेपोटी दीड लाख रूपये शहिदांच्या वीरपत्नींना अर्पण केलेत.

पुलवामाच्या घटनेत विदर्भातील नितीन राठोड आणि संजय राजपूत हे वीर जवान शहीद झालेत. त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम झाला. यात अमरावतीकरांनी दीड लाख रूपयांची देणगी दिली. ही देणगी वीरपत्नी वंदना नितीन राठोड आणि सुषमा संजय राजपूत यांच्या कार्यक्रमातच प्रदान करण्यात आली. यावेळी सिव्हील सर्जन डॉ. निकम, खंडेलवाल ज्वेलर्सचे दीपक खंडेलवाल, सेंट्रल जेलचे डी.वाय.एस.पी. पीटर गायकवाड, सेंट पीटर स्कूलचे संचालक वीरसेन आगलावे, रतन इंडिया पॉवर प्लांटचे अनिल मिश्रा, डॉ. आशा ठाकरे, गुरूमूर्ती चावली, जयंत वाणे, प्रा. रोमहर्ष बुजरूक आणि मान्यवर उपस्थित होते.

दीपक जोशी यांच्या प्रयत्नांतून अमरावतीकरांनी अनुभवले किशोर कुमार

दीपक जोशी यांच्या योगदानाबद्दल त्यांचा हृद्य सत्कार

भारतातले टॉपचे व्हॉईस ऑफ किशोरकुमार म्हणून पुण्याचे अनिल घाडगे ओळखले जातात. त्यांना या शोसाठी अमरावतीला आणण्याचं पूर्ण श्रेय दीपकजी जोशी यांना जातं. त्यांच्याच प्रयत्नांतून या कार्यक्रमाला चार चांद लागलेत. दीपकजी हे स्वत: उत्तम गायक आहे. पुण्यातील मेक शुअर हॉलिडेज प्रा.लि., मेक शुअर एक्स्पोर्ट, मेक शुअर प्रॉपर्टी मॅनेजमेंटचे ते संचालक आहेत. पुण्यातील आपल्या मोठ्या व्यवसायाचा आवाका सांभाळून ते संगीतसेवा करतात. पुलवामा शहिदांच्या या कृतज्ञता सोहळ्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यानिमित्त त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

शहिदांच्या परिवाराला मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी कार्यक्रमातदेखील मदत केली. एकुण 1 लाख 52 हजार रूपयांचा निधी सिंफनी गृपने लोकसहभागातून उभारला. अत्यंत भावपूर्ण वातावरणात हा निधी वीरपत्नींना दिला. रतन इंडिया पॉवर प्लांट, बडनेरा येथील सेंट पीटर इंग्लिश मिडियम स्कूल, दीपक खंडेलवाल, संजय सोजरानी, बाबू सेठ मत्तानी, हेमंत बागडे, कॅम्प येथील राज भारत गॅस, राणी पद्मीनी महिला संघटन, संजिवनी दीक्षित, श्री राजपूत करणी सेना, सपना ठाकूर, प्रा. रोमहर्ष बुजरूक, गुरूमूर्ती चावली, आशीष गावंडे, राजेश्वरी स्कूलच्या गट्टाणी मॅडम, शिवाजी बी.एड. कॉलेजच्या वनीता मॅडम, प्रा. धांडे, प्रा. ठक्कर, लायन्स क्लब ऑफ अमरावतीचे आशीष बरडेकर आणि अनेक अमरावतीकरांनी यावेळी आपले आर्थिक योगदान केले.

व्हॉईस ऑफ किशोरकुमार म्हणून प्रसिद्ध असलेले पुण्याचे अनिल घाडगे आणि प्रमोद ढगे यांनी किशोर कुमार यांच्या आवाजातली विविध गाणी पेश केलीत. डॉ. नयना दापूरकर आणि निक्की रायकुवार यांनी आपल्या गायनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. ऑक्टोपॅडची राजेंद्र झाडे, तबल्याची विशाल पांडे, ढोलकीची हितेश व्यास, गिटारची सौरभ डोनाल्ड तर बेस गिटारची रोशन यांनी साथ केली. संगीत संयोजन आणि किबोर्डची साथ सिंफनीचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी केली.

नासीर खान यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने कार्यक्रमात जान आली. रॉयल साउंडचे रईसभाई यांनी ध्वनीव्यवस्था सांभाळली. उद्घाटन सोहळ्याचं संचालन तेजस बोरकर यांनी केलं. आभार महिंद्राच्या जनरल मॅनेजर सुचिता खुळे यांनी मानले. सिंफनीने घेतलेल्या या उपक्रमाला अमरावतीकरांनी भरभरून दाद दिली. हा कार्यक्रम गुरुमूर्ती चावली आणि जयंत वाणे यांच्या नियोजनात झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.