विवेक तोटेवार, वणी: पुष्पा सिनेमात रक्त चंदनाची तस्करी करण्यासाठी सिनेमातील हिरो पुष्पाराज हा वेगळ्या युक्ती लढवत होता. यात सर्वात प्रसिद्ध शक्कल होती दुधाच्या टँकरमधून रक्तचंदनाची तस्करी करणे. अशीच पुष्पा स्टाईल होणा-या तंबाखू तस्करीचा पर्दाफाश रविवार सकाळी वणी पोलिसांनी केला. गाडगे बाबा चौकात एका दूध पोहचविणाऱ्या गाडीची पोलिसांनी तपासणी केली असता यात प्रतिबंधीत मजा तंबाखूचे बॉक्स असल्याचे आढळले. यामुळे पोलीसही अचंभीत झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र ज्यांनी माल बोलावला होता तो कोण? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणेदार अनिल बेहराणी यांना खबरीद्वारा वणीत सकाळी सुगंधित तंबाखूची तस्करी होत आहे. यावरून ठाणेदार यांनी डीबी पथकाला रवाना केले. दरम्यान गाडगेबाबा चौकात निकिता एजन्सी येथे एक मालवाहक (MH31 CQ8815) उभी असल्याचे दिसून आले. या गाडीच्या मागे आणि पुढे दूधगंगा असे लिहिले होते. त्यावरून यात दूध वाहतूक होत असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत होते.
पोलिसांनी गाडीच्या मागील डाल्याची पाहणी केली असता त्यामध्ये ब्रेड व दूध वाहून नेण्याचे 85 ट्रे होते. मात्र गाडीत सुगंधी तंबाखूचा उग्र वास पसरलेला होता. त्यामुळे त्यांनी गाडीचा चालक व क्लिनर याला विचारणा केली असता त्यांनी गाडीत तंबाखू असल्याची माहिती दिली. यात महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूच्या 13 बोऱ्या आढळून आल्या. पोलिसांनी चालक सागर प्रकाश चौधरी (26) रा. कोहमारा जिल्हा गोंदिया हल्ली मुक्काम नागपूर, व क्लिनर प्रणय राजेश सावरकर (41) रा. नंदनवन नागपूर यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी पंचनामा करून वाहन वणी पोलीस ठाण्यात आणले व अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ जी पी दंदेयांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम 188, 272, 273, 328, 34 सहकलम अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमने 2011 चे कलम 59 नुसार गुन्हा नोंद दाखल केला.
माल कुणाकडे पोहोचवला जात होता?
गेल्या तीन चार दिवसांपासून पोलीस पानटपरीवर धाड टाकून खर्रे जप्त करीत आहे. मात्र त्यांना तंबाखू पोहचवणारे मात्र अद्यापही मोकाटच होते. आता ही तस्करी उघडकीस आल्याने हा माल कुणाकडे पोहोचवला जात होता हा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या याची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे हे माल बोलवणारे कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी सुगंधित तंबाखूचे 200 ग्राम वजनाचे 520 डब्बे ज्याची किंमत 4 लाख 86 हजार 200 रुपये व या गुन्ह्यात वापरलेला टाटा कंपनीचा एलपीडी किंमत 10 लाख असं एकूण 14 लाख 86 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी सागर प्रकाश चौधरी व प्रणय राजेश सावरकर यांना अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक पावन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माधव शिंदे, सुदर्शन वनोळे, पंकज उंबरकर, वसीम शेख, विशाल गेडाम, शाम राठोड, गजानन कुडमथे यांनी केली.
Comments are closed.