बहुगुणी डेस्क, वणी: वरोरा रोडवरील एका बारमध्ये गुरुवारी रात्री उशिरा दारू पिण्यावरून दोन गृपमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात दोन्ही गृपच्या लोकांनी फिल्मीस्टाईल एकमेकांवर डोक्यावर बियरच्या बॉटल फोडत एकमेकांना मारहाण केली. यात दोघे जण जखमी झाले आहेत. दारू न पाजल्यामुळे हा वाद झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एवढ्या रात्री बार सुरु कसे? हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहे.
पहिल्या तक्रारीनुसार, फिर्यादी अजहर मोहम्मद शेख (35) वणी येथील रहिवासी आहे. गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रात्री तो त्याच्या दोन मित्रांसह वरोरा रोडवरील एका बारमध्ये गेला. तिथे तो बसलेल्या टेबल समोर आरोपी छोटू राय (32) रा. कुंभारखनी, राहुल संजय चिंचोळकर (23) रा. इंदिरा चौक, वणी व अमिर उर्फ जर्मन मेहबूब शेख (29) रा. चिखलगाव हे बसून होते. यावेळी छोटू राय हा अजहर बसलेल्या टेबलवर गेला व त्याने अजहरला दारू पाज असे म्हटले. मात्र अजहरने त्याला नकार दिला. त्यावरून त्यांच्यात वाद सुरु झाला.
मित्राचा वाद झाल्याने छोटू राय सोबत बसलेले त्याचे दोन साधीदार अजहर बसलेल्या टेबलवर गेले व त्यांनी अजहरला मारहाण करण्यास सुरुवात केली. तर राहुल याने टेबलवर ठेवलेली बियरची बॉटल उचलून अजहरच्या डोक्यावर मारली. यात त्याचे डोके फुटले. तसेच छोटू व त्याच्या मित्रांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
दुस-या तक्रारीनुसार, फिर्यादी राहुल चिंचोलकर हा त्याच्या मित्रासह एका टेबलवर बसला होता. दरम्यान छोटू हा त्याच्या जवळ असलेल्या टेबलवर गेला. तिथे छोटूचा अजहर शेख, त्याचा मित्र सलमान शेख (33) व अशफाक शेख (36) रा. वणी यांच्यासोबत वाद झाला. वाद वाढत गेल्याने अजहरच्या मित्राने छोटूला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राहुल व त्याचा साथीदार वाद सोडवण्यास तिथे गेले. दरम्यान अजहरने टेबलवर ठेवलेली बियरची बॉटल उचलून राहुल याच्या डोक्यावर मारली. यात त्याचे डोके फुटले. तर सलमान व अशफाक यांनी बुक्यांनी तोंडावर मारहाण केल्याने यात त्याचे ओठ फुटले. तसेच त्यांनी राहुलला जीवे मारण्याची धमकी दिली.
दोन्ही गटाने रात्री उशिरा वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही तक्रारीनुसार आरोपी छोटू राय, राहुल चिंचोळकर, अमिर उर्फ जर्मन मेहबूब शेख व अजहर शेख, सलमान शेख व अशफाक शेख यांच्याविरोधात भादंविच्या कलम 324, 34, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जगदिश बोरनारे करीत आहे.
रात्री उशिरा पर्यंत बार सुरु कसे?
बारमध्ये दारू पिण्यावरून शुल्लक वाद होणे ही नित्याचीच बाब आहे. मात्र क्वचित प्रसंगी मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचते. सदर घटना ही रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र एवढ्या रात्री बार सुरू कसे? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Comments are closed.