मेघदूत कॉलोनीत राडा, वणीत सुरू झाला कोळसा वार?

जितेंद्र कोठारी, वणी: व्यावसायिक स्पर्धेतून दोन कोळसा ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये मेघदूत कॉलोनीत राडा झाला. शनिवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. लाठी काठीसह बोलेरो व काळीपिवळीने जमाव राडा करण्यासाठी गेले होते. त्यामुळे मेघदूत कॉलोनीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी फिर्यादी व कोळसा व्यावसायिक तिरुपती बकय्या लकमावार यांच्या तक्रारीवरून 12 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 5 जणांना सकाळी अटक करण्यात आली तर उर्वरित फरार झाले. व्यावसायिक स्पर्धेतून निर्माण झालेला वाद शिगेला पोहोचल्याने ही घटना घडल्याची माहिती आहे.

सविस्तर वृत्त असे की तिरूपती बकय्या लकमावार (35) हे मेघदूत कॉलोनी चिखलगाव येथील रहिवासी आहे. ते कोळशा वाहतुकीचा व्यवसाय करीत असून त्यांचे लाल पुलिया परिसरात बालाजी ट्रान्सपोर्ट नामक प्रतिष्ठान आहे. तर आरोपी मतीन खान (35) रा. चिखलगाव, अन्वर खान (41) रा. राजूर खान व बाबू उर्फ नसीर खान रा. राम शेवाळकर परिसर यांचे के. के. ट्रान्सपोर्ट नामक प्रतिष्ठान आहे. ते देखील कोळसा वाहतुकीचे काम करतात.

शुक्रवारी दिनांक 30 जून रोजी तिरुपती हे त्यांचे पार्टनर महेश मातंगी यांच्यासह एकोना खाण, वरोरा येथे कामानिमित्त गेले होते. तिथे त्यांचा खाणीतील सुपरवायझर सोबत वाद झाला. शनिवारी दिनांक 1 जुलै रोजी मतिनचा लहान भाऊ अतिक यांने तिरुपती यांना फोन केला व तु माझा भाऊ मतिनला का शिव्या दिल्या? अशी विचारणा केली. फोनवरचा वाद वाढत गेला व माझा भाऊ मतिन तुला मारायला येत आहे अशी धमकी तिरुपतीला दिली.

रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोपी हे बोलेरो (MH 34 BR 8787) व काळी पिवळी हे दोन वाहन घेऊन मेघदूत कॉलोनी येथे तिरुपती यांच्या घरासमोर गेले. सर्व आरोपी कारमधून लाठी काठी घेऊन उतरले व तिरुपतीला मारण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तिथे आरोपींनी राडा केला. दरम्यान तिरुपती यांनी तिथून पळ काढला. दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

रात्री उशिरा तिरुपती बकय्या लकमावार यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी 12 आरोपींवर भादंविच्या कलम 143, 144, 147, 148, 506 नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी मतिन अहेमद वहाज अली शेख (35) रा. ढुमणे ले आउट चिखलगाव, अनवर खान हकीब खान (41) रा. राजूर कॉलरी, मोहम्मद आतिक वहाज अली शेख (27) रा. राजूर कॉलरी, मोहम्मद जीमल अनुलहक शेख (21) रा. राजूर कॉलरी, बाबू उर्फ नसीर खान रा. राम शेवाळकर परिसर वणी यांना अटक केली आहे. तर मोहम्मद आरीफ सिद्धीकी रा. माजरी कॉलरी व राहुल ठाकूर रा. चंद्रपूर यांच्यासह 7 आरोपी फरार आहेत.

 

पुन्हा सुरू झाला कोळसा वार?
30 वर्षांपूर्वी वणीत दोन कोळसा व्यावसायिकांमधला वाद शिगेला पोहोचला. व्यावसायिक स्पर्धेतून झालेल्या या वादातून एका व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला होता. पुढे याचा सूड घेत दुस-या व्यावसायिकाची सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शहरातील कोळसा वार शांत झाले होते. या घटनेमुळे शहरात पुन्हा कोळसा वार तर सुरू झाले नाही अशी चर्चा होत आहे.

पोलिसांनी दोन्ही गाड्या जप्त केल्या आहे. मेहदूत कॉलोनीत वेळीच पोलीस पोहोचल्याने कोणतीही अनुचित प्रकार येथे झाला नाही. घटनेचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय आशिष झिमटे करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.