जितेंद्र कोठारी, वणी: अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना उघडण्यावर बंदी असताना ग्राहकांना मागील दारातून कापड खरेदीची ‘सुविधा’ देणा-या वणीतील सुप्रसिद्ध सुविधा कापड केंद्रावर स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी दुपारी धाड टाकून दुकान सील केले. तसेच दुकान मालकांकडून 50 हजार रुपये दंडही वसूल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार नगर परिषद मुख्याधिकारी रवींद्र कापशीकर यांना येथील प्रख्यात सुविधा कापड केंद्रातून लपून छपून ग्राहकांना कापड विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून मुख्याधिकारी कापशीकर यांनी पोलीस व पथकासह दुपारी 11 वाजता दरम्यान सुविधा कापड केंद्राची तपासणी केली असता दुकानाचे समोरील शटर बंद होते.
परंतु दुकानाच्या मागील बाजूस असलेले दारातून दुकान मालक प्रशांत गुंडावर काही महिला ग्राहकांना कापड विक्री करताना आढळून आले. त्यामुळे पथकाने सुविधा कापड केंद्र या दुकानाला सील ठोकले. तसेच लॉकडाउन व संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्यावरून 50 हजार रुपये दंडसुद्दा ठोठावण्यात आले.
मागील पंधरा दिवसात वणी शहरात सहा दुकानांना सील ठोकण्यात आली असूनही मोठे दुकानदार नियमांचे उल्लंघन करून लपून छपून व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी माहेर कापड केंद्र, राधिका साडी सेंटर, टाइम्स स्टुडिओ, वर्धमान स्टील स्क्रॅप व शकील ट्रेडर्स या दुकानांवर प्रशासनाने कार्यवाही करून 3 लाख रुपये दंड वसूल केले आहे.
प्रशासनाची धडक कारवाई सुरू असल्यामुळे एकीकडे लहान व्यावसायिक दुकाने बंद करून घरी बसले आहे तर दुसरीकडे अनेक मोठे व्यावसायिक नियम झुगारून आतील दारातून व्यवसाय करताना आढळत आहे. सदर कारवाई प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र कापशीकर, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, नगर परिषदचे धम्मरत्न पाटील व पथकाने केली.
सकाळी सहा वाजता पासून धंदे सुरू
बंदी असताना शहरात अनेक व्यावसायिक सकाळी 6 वाजता पासून दुकानाच्या मागील दारातून ग्राहक आत बोलावून व्यवसाय करीत असल्याची चर्चा आहे. लग्नसराईचे दिवस असल्यामुळे कापड व सराफा व्यवसायिक लपून छपून दिवसभरात लाखों रुपयांचे माल विक्री करीत आहे. त्यामुळे अशा दुकानदारांवर कारवाई करणे गरजे आहे.
हे देखील वाचा: