जत्रा मैदानातील मटका पट्टीवर पोलिसांची धाड

जुगार खेळताना दोघांना अटक, इतर पळून जाण्यात यशस्वी

बहुगुणी डेस्क, वणी: दीपक चौपाटी जवळील जत्रा मैदानात मटका जुगार खेळणाऱ्या दोन व्यक्तींना वणी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी दिनांक 20 जुलै रोजी सायंकाळी 5:00 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. इतर काही संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले.

तक्रारीनुसार, पोलिसांना खबरीकडून दीपक टॉकीज परिसरात काही लोक मटका जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांचे पथक जत्रा मैदान येथे गेले. तिथे त्यांना काही लोक मटका हा जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी धाड टाकताच घटनास्थळी पळापळ झाली. मात्र दोघे जण पोलिसांच्या हाती आले. गुलाब बापुराव उपरे (वय 40, रा. लाठी, ता. वणी) आणि प्रवीण सूर्यभान गेडाम (वय 36, रा. पुरड, ता. वणी) यांना अटक करण्यात आली. तर इतर लोक पळून जाण्यात यशस्वी झालेत. 

त्यांच्याकडून एक पांढरा चार्ट (ज्यावर लाल रंगात 1 ते 10 आकडे लिहिलेले), लाल आणि काळ्या रंगात 1 ते 10 आकडे असलेले प्लास्टिकचे पत्ते, तसेच 4,670 रुपये रोख (गुलाब उपरे यांच्याकडून 2,000 रुपये आणि प्रवीण गेडाम यांच्याकडून 2,670 रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1939 च्या कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक उंबरकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल सावसागडे (NPC/2308) करत आहेत.

Comments are closed.