मनसे राबविणार राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना

पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाकांक्षी योजना

जितेंद्र कोठारी, वणी :  मागील 20 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वणी उपविभागातील हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिके उध्वस्त झाली आहे. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. परंतु पंचनामा अहवाल तयार करणे, शासनाकडे सादर करणे व त्यानंतर नुकसान भरपाई मिळण्यास भरपूर वेळ लागणार आहे. तोपर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना जगणे कठीण होईल. हीच बाब लक्षात घेऊन मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून यवतमाळ जिल्ह्यात 1 ऑगस्ट पासून ‘सन्माननीय राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना’ राबविण्यात येत आहे.

या योजनेमध्ये पुरामुळे ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना उभारी मिळावी म्हणून वणी उपविभागातील जवळपास 600 ते 700 शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे, खते, कीटकनाशके व इतर शेतीसाहित्य शेतकऱ्यांना त्यांच्या घरपोच नेऊन दिले जाणार आहे . याशिवाय दोन टप्प्यात 5-5 हजार असे एकूण 10 हजार रुपये या योजनेत सामावून घेतलेल्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत .

शेतकरी दत्तक योजनेत नोंदणीसाठी काही निकष ठेवण्यात आले आहे. त्यात 5 एकरापेक्षा कमी शेतजमीन असलेले तसेच कुटुंबातील सदस्य नोकरीत नसणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. गरजू व पूरग्रस्त शेतकऱ्यांनी स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रेसह संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन मनसेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत.

बळीराजाला उभारी देण्याचा छोटासा प्रयत्न
वणी, मारेगाव व झरी तालुक्यात पूराने थैमान घातला आहे. जगाचा पोशिंदा संकटात असताना मुख्यमंत्री आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पाहिजे होते. पण राज्यात आतापर्यंत मंत्रिमंडळाचे गठनही झालेले नाही. मदत तर दूरच, प्रशासन गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले देखील नाही . शेतकरी भयभीत झाला आहे. त्यामुळे ‘सन्माननीय राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक बळीराजाला उभारी देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
राजू उंबरकर : प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Comments are closed.