ब्रेकिंग न्यूज: वणीतील दाम्पत्याचा हेलिकॉप्टर क्रॅश होऊन मृत्यू

राजा जायसवाल त्यांची पत्नी व मुलीचा उत्तराखंड येथे अपघात

विवेक तोटेवार, वणी: वणीतील व्यावसायिक राजा जायसवाल त्यांची पत्नी श्रद्धा जायसवाल व त्यांची 2 वर्षीय मुलगी काशी जायसवाल यांचा उत्तराखंड येथे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन अपघाती मृत्यू झाला. ते देवदर्शनासाठी उत्तराखंड येथे गेले होते. केदारनाथधामकडे सकाळी 5 वाजताच्या सुमारास ते हेलिकॉप्टरने गेले होते. त्यानंतर परतताना हा अपघात झाला. आर्यन एव्हिएशनचे हे हेलिकॉप्टर होते.

हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असताना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण यांच्या दरम्यानच्या जंगलामध्ये क्रॅश झाले. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 7 प्रवासी होते. यात वणीतील जायसवाल कुटुंबातील तिघांचा समावेश होता. 

अपघाताचे मुख्य कारण खराब हवामान असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. गौरीकुंड-सोनप्रयाग परिसरात दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे दृश्यता कमी झाली होती. यामुळे हेलिकॉप्टरने नियंत्रण गमावून जंगलात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. राजा जायसवाल व त्यांचे कुटुंबीय या अपघातात मृत झाल्याचे कळताच वणीत शोककळा पसरली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी मध्ये कोळसा व्यावसायिक, ट्रान्सपोर्टर व शिवभक्त म्हणून राजकुमार जयस्वाल यांची ओळख होती. वणीत प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराण कार्यक्रम राजा जायसवाल यांनीच घडवून आणला होता. अत्यंत कमी वयात एक व्यावसायिक म्हणून त्यांनी वणीत ओळख बनविली. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी श्रद्धा हिच्यासोबत विवाह केला. 

वणीतील वरोरा बायपास जवळ त्यांचे ऑफिस आहे. त्यांच्या मागे दोन मुले, आई असा आप्तपरिवार आहे. अत्यंत धार्मिक व्यक्ती म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या अचानक मृत्यूने संपूर्ण वणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.