बहुगुणी डेस्क, वणी: माजी नगरसेवक व रंगारी पुरा येथील रहिवासी असलेले राजू वामनराव डफ (52) यांचे आज दुपारी अपघाती निधन झाले. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास जामनी जवळील फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू वामनराव डफ हे रंगारीपुरा येथील रहिवासी होते. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ते काही कामानिमित्त त्यांच्या स्प्लेंडर (MH29AS 1856) या दुचाकीने झरी येथे गेले होते. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास वणीला परतताना जामनी गावाजवळील फाट्याजवळ त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्यांच्या दुचाकीची रस्त्याच्या कडेला खाली जाऊन कोसळली.
जवळच असलेल्या शेतात काम करणा-या महिलांना अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड करत जवळच असलेल्या नागरिकांना बोलावून घेतले. जवळच असलेले नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाटण पोलिसांना याची माहिती दिली. तसेच रुग्णवाहिका बोलावली. त्यांना झरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
झरी येथील काम आटोपल्यानंतर त्यांनी काही परिचितांच्या भेटीगाठी घेतल्या. आज झरी येथील बाजाराचा दिवस होता. त्यामुळे त्यांनी परततना काही खरेदी केली. त्यांनी पिशवी दुचाकीच्या हॅन्डलला लावली. तसेच त्यांच्या सोबत असलेले हेल्मेट देखील त्यांनी हँडलला लावले होते. वणीला परतताना जामनीजवळील वाय पॉइंटवर वळण घेताना हँडल अडकल्याने त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला असावा, असे अंदाज काही प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.

राजू डफ हे मनमिळावू स्वभावाचे होते. तसेच ते कायम लोकांच्या मदतीला धावून जात होते. ते 2011 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे कडून नगरसेवक म्हणून निवडून देखील आले होते. त्यांच्या निधनाची वार्ता वणीत पोहोचताच हळहळ व विविध क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी, मुलगा, भाऊ व मोठा आप्त परिवार आहे.





Comments are closed.