बहुगुणी डेस्क, वणी: असे म्हणतात की जेव्हा नोकरी-पाणी, सुखी संसार, पैसा आडका असे सर्व काही आयुष्यात सुरळीत असले की व्यक्तीच्या मनात हे रुटिन बदलवण्यसाठी काहीतरी थ्रील करण्याची इच्छा होते. आणि या थ्रिलमध्ये पहिला क्रमांक लागतो तो अनैतिक संबंधाचा ! एकीकडे संसार, कुटुंब आणि जबाबदाऱ्या… तर दुसरीकडे अनैतिक नात्यांचा स्फोटक असा ‘एपस्टिन’ खेळ! मारेगाव तालुक्यातील एका शांत कुटुंबाच्या आयुष्यात असेच वादळ उसळले, जे अनैतिक संबंधांपासून सुरू झाले आणि थेट 5 लाख रुपयांच्या खंडणी व पोलीस तक्रारीपर्यंत जाऊन पोहोचले. पत्नीला पतीच्या अनैतिक नात्याबाबत कळताच या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली—आणि त्यातूनच उघडकीस आली बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी, आणि करण्यात आलेली मोठी आर्थिक मागणी. या गंभीर प्रकरणी धमकी देणारी महिला व तिच्या भावाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अमित (नाव बदललेले, वय 48) हा मारेगाव तालुक्यातील एका गावात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून तो नोकरी करतो. याच गावात रेखा (नाव बदललेले, वय 33) ही महिला राहते व तीही नोकरीस आहे. अमित आणि रेखा यांच्यात दीर्घकाळापासून अनैतिक संबंध होते. याची गावात चांगलीच खमंग चर्चा रंगायची. अखेर एक वर्षाआधी ही बाब अमितची पत्नी जया (नाव बदललेले) हिच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर तिने पतीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. पतीला कुणाचे कॉल येतात. पती कुणाशी चॅटिंग करतो का? कॉल हिस्ट्री डिलिट तर केली नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे तो ड्युटीनंतर लगेच घरी परततो की कुठे थांबतो. अशी पतीवर वॉचिंग सुरु होती.
सुमारे 15 दिवसांपूर्वी अमित ड्युटी संपल्यानंतर घरी परतला नाही. त्यामुळे जया ही मुलीला सोबत घेऊन त्याचा शोध घेण्यासाठी निघाली. त्या अंदाज घेऊन थेट रेखाच्या घरीच गेल्या. योगायोगाने त्या वेळी अमित रेखाच्या घरातून बाहेर पडताना दिसला. जया रेखाला भेटली. तिने आपला संसार आणि मुलांचा हवाला देत पतीपासून दूर राहण्याची विनंती केली. मात्र रेखाने, “मला तुझा नवरा हवा आहे. तुला तो हवा असेल तर 5 लाख रुपये दे, नाहीतर त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत आहे.
यानंतर जया पतीला घेऊन घरी परतली. मात्र रेखा सातत्याने अमितला फोन करून त्रास देत होती. कॉल न उचलल्यास इतर क्रमांकावरून कॉल करायची. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही फोन लावून त्रस्त करायची. पुढे या प्रकरणात रेखाचा भावाची एन्ट्री झाली. त्याने जयाच्या मुलाला फोन करून 5 लाख रुपये दे, अन्यथा तुझ्या वडिलांना अडकवू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, पैसे न मिळाल्याने रेखाने अखेर पोलीस ठाण्यात अमितविरुद्ध तक्रार दिली.
त्यानंतर अमित हा रेखाला भेटला व त्याने तिला 5 लाख रुपये देणे शक्य नसल्याचे सांगत तक्रार मागे घेण्याची विनंती केली. मात्र पैसे न मिळाल्याने रेखाने तक्रार मागे घेतली नाही. तक्रार मागे न घेतल्याने जयाने रेखा व तिच्या भावाविरोधात खंडणीची तक्रार दिली. तपासाअंती पोलिसांनी रेखा व तिच्या भावाविरोधात बीएनएस कलम 308(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.





Comments are closed.