राजूर येथे जादूटोण्याचा प्रयोग करून घाबरविण्याचा प्रयत्न

पीडिताची जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कार्यवाही करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर येथे जादूटोण्याचा प्रयोग करून दहशत परसवण्याचा प्रकार समोर आला आहे. एका ऑटोमध्ये बाहुली व लिंबू टाकण्याचा प्रकार सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी ऑटोचालकाने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अघोरी जादूटोण्याचा प्रयोग करणारा कोण? दहशत पसवणारा सापडेल का? जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल का? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राजूर येथील वार्ड क्रमांक 4 मधल्या पीपल दफाई या भागात ऑटोरिक्षा चालक नौशाद अहमद हा राहतो. रात्री नौशाद यांनी ऑटो घरासमोर लावला होता. आज शुक्रवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास नौशाद आपल्या ऑटोची सफाई करण्यासाठी गेले असता त्यांना ऑटोच्या डॅशबोर्डवर काळ्या रंगाची बाहुली तसेच सोबत एक लिंबू ठेवलेला आढळला. इतरत्र शोध घेतला असता घराच्या दाराजवळ सुद्धा एक बाहुली ठेवलेली आढळली.

हा सर्व प्रकार पाहून नौशाद याचे कुटुंब पुरते घाबरले असून त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे. नौशाद अहमद यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, हा अघोरी व जादूटोण्याचा प्रकार करणारा अज्ञात असला तरीही नक्कीच शत्रुत्व बाळगणारा असून त्याच्या हेतू हा नौशाद ह्याचे अहित लक्षात ठेऊन मानसिक, शारीरिक व आर्थिक हानी पोहोचविण्याचा असू शकतो.

त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पारित केलेला २०१३ च्या अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलमानुसार घबराट निर्माण करून हानी पोहोचविण्याचा जादूटोणा करणे किंवा तशी कृती करणे अपराध असून त्यानुसार कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

जादूटोण्याचे प्रकार आजही सुरू…
21 व्या शतकात प्रवेश करून पदोपदी आपण विज्ञानाचा वापर करीत जीवन कंठीत आहोत. विज्ञाना शिवाय आजच्या युगात एकही पाऊल पुढे टाकणे कठीण आहे. विज्ञान युगात जगत असताना आजही कुणाही वैऱ्या सोबत पुरातन अवैज्ञानिक रीतीने जादूटोण्याचा प्रकार करून किंवा प्रयोग करून शत्रू ला नामोहरम करण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद वाटतात. मात्र तरी वैज्ञानिक दृष्टी नसलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रकार आजही सुरु असल्याचे समाजात आढळते.

Comments are closed.