राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 50 लाखाचे बांधकाम रखडले

जिल्हा परिषद सदस्याच्या गावातच समस्यांचा डोंगर

0

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीसाठी तसेच विविध कामासाठी जवळपास 50 लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र यातील थोडेफार काम करून कंत्राटदारांनी देयके काढून घेतली व सदर बांधकाम अर्धवट ठेवले आहे. तसंच सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम असल्याची तक्रार सरपंच प्रणिता मो असलम यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे केली आहे. मात्र अनेकदा तक्रारी करूनही त्यांच्या तक्रारीला कच-याची पेटी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम विभाग जणू कंत्राटदारांची पाठराखण करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. इतकेच नव्हे तर जिल्हा परिषद सदस्यांच्या गावातच समस्यांचा डोंगर असल्याने त्यांच्याही कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या राजूर कॉलरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याच गावातील पुर्वीचे ग्रामपंचायत सदस्य व सध्याचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुध्दा आहे. जिल्हा परिषद सदस्य संघदिप भगत यांच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध कामाच्या दुरूस्तीसाठी शासनाने निवास दुरूस्ती 5 लाख 74 हजार, दुसरे निवास दुरूस्ती 7 लाख 87 हजार, कर्मचारी निवासस्थान 6 लाख 73 हजार, मुख्य इमारत दुरूस्ती 12 लाख 21 हजार, काँक्रीट रस्ता 17 लाख 32 हजार रूपये असा एकूण 49 लाख 87 हजार रूपयाचा निधी पीएच योजने अंतर्गत मंजूर झाला होता.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्ती कामासाठी वडजापूर कामगार संस्था, चंद्रशेखर बोनगिरवार पाटण, आशिष ढेकरे भांदेवाडा, कन्नमवार कामगार संस्था वणी, व राजू येल्टीवार पाटणबोरी या कंत्राटदारांना काम देण्यात आले होते. सदर काम करण्यासाठी सहा महिण्याचा कालावधी देण्यात आला होता. मात्र यातील काही लोकांनी अर्धवट दुरूस्तीचे काम केले तर काहींनी कामाला अद्यापही सुरूवात केली नाही. पण जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केवळ टक्केवारी जोपासत कामाच्या देयकांची उचल केली आहे.

याबाबत सरपंच प्रणिता मो असलम यांनी वारंवार जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे केल्या होत्या, पण जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाकडे व तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत वेळकाढू धोरण राबवित कंत्राटदारांची पाठराखण केली असल्याचा आरोप सरपंच प्रणिता मो असलम यांनी केला आहे.

जिल्हा परिषद अतंर्गत दलित वस्ती मुख्य रस्त्याचे काम डिसेंबर 2016 मध्ये मंजूर झाले होते. या कामाचा कंत्राट व्हि आर खरे यांना देण्यात आला होता. सदर काम 22 लाख 50 हजार रूपयाचे होते व काम पूर्ण करण्याचा कालावधी तिन महिने असतांना सदर कंत्राटदारांने अद्यापही बांधकामाला सुरूवात केली नाही हे विशेष.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दिरंगांई करणा-या कंत्राटदारांना अभय देत राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुरूस्ती करण्याचे कामात कंत्राटदारांना मुभा देत विकासाला खिळ लावण्याचा प्रकार केला आहे. सोबतच जिल्हा परिषद सदस्याचा गावातच असा प्रकार होत असतांना जि प सदस्य मात्र बघ्याची भूमिका वटवित असल्याचे यावरून दिसून येत आहे. विकास कामांना जिल्हा परिषद सदस्यांच्या गावातच खिळ बसल्याने ते अधिका-यांची बाजू घेतात की गावाचा विकास बघतात हे एक कोडेच आहे.

एकूणच राजूर कॉलरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्ती कामात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंते व कंत्राटदार यांनी संगणमताने अनागोंदी केल्याचा प्रकार घडला आहे. यासंबधीच्या तक्रारी सरपंच प्रणिता मो असलम यांनी वारंवार करून देखील प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने संबधीत कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या संबधीत अधिका-यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सरपंच प्रणिता मो असलम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्यमंत्री आणि मंत्रालयातील विविध विभागाचे मंत्री तसेच अधिकारी यांचकडे तक्रार निवेदन देवून केली आहे. सोबतच या कामात झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी अशी विनंती सुध्दा सरपंचानी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.