अयोध्येशी नाळ जुळलेले वणीतील राम मंदिर

प्रासंगिक: सव्वाशे वर्ष जुने इंग्रजकालीन मंदिर

0 2,270

श्रीवल्लभ सरमोकदम (विशेष प्रतिनिधी) वणी: वणी… चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेलगत असलेलं यवतमाळ जिल्ह्यातील हे एक छोटेखानी शहर… तसं हे शहर जुनंच वेगळ्या धाटणीचं… चौकोणी रस्त्यांचं… जुनाट वाड्यांचं… इंग्रजकालीन शासकिय इमारतींचं… येथील सांस्कृतिक वारसा देखील अत्यंत जुना… त्याच रांगेत बसतील अशी इथली मंदिरही तेवढीच जुनी… काहींचे अस्तित्व अगदी शेकडो वर्षांपूर्वीचे… तर काहींचे शेदीडशे वर्षांचे…. कला व स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले, प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य यातीलच एक मंदिर म्हणजे शहराच्या मध्यवस्तीत असलेलं प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर… सव्वाशे वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची नाळ थेट अयोध्येशी जुळलेली आहे.

सन 1893 मध्ये निर्माण झालेल्या या मंदिरातील राम, लक्ष्मण, सीता या तीनही मूर्ती त्यावेळी अयोध्येत साकारण्यात आल्या. तेथून वणीला आणून त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संगमरवरी पाषाणातील या मूर्तीचे रेखीव काम आजच्या मूर्तीकारांनाही लाजवेल असे असल्याचे अनेक जाणकार सांगतात. मूर्तीच्या चेह-यावरील भाव भाविकांना एक वेगळीच अनुभूती देतात. राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्तीसमोर डाव्या बाजूला छोटेखानी हनुमंत व उजव्या बाजुला गरूड राजाची मूर्ती स्थापित आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वारावरील रचना पेशवाई महिरपा समान आहे. मंदिराच्या वर बाहेरील बाजूला चारही कोप-यात मर्कटराज मूर्तीरुपात मंदिराचे रक्षण करीत आहे. मंदिराच्या कळसाच्या घुमटावर पूर्व दिशेला ध्यानस्थ ऋषीची तर अन्य तीन दिशांना दास दासी समान दिसणा-या दगडी प्रतिमा अंकित आहे.

खासगी असलेल्या या मंदिराची देखभाल व व्यवस्थापन मागील तीन पिढ्यांपासून वर्मा परिवार करीत आहे. याच परिवारातील दुस-या पिढीतील कृष्णकुमार (मुन्नादादा) वर्मा सांगतात मंदिरासमोर जुन्या पद्धतीचा असलेला लादणीचा सभामंडप कालांतराने जमिनदोस्त झाला. त्यानंतर 1991-92 च्या सुमारास त्यांनी सिमेंट काँक्रेंटचा सभामंडप उभारला.

मूळ मंदिराच्या निर्मितीसंदर्भात अधिक प्रकाश टाकताना ते म्हणतात मंदिर निर्मितीचा काळ देशाच्या पारतंत्र्याचा आहे. त्यावेळी वणी हे जिल्ह्याचे ठिकाण होते तर कायर हे तालुक्याचे ठिकाण. किशनलाल परदेशी हे त्यावेळी कायर मंडळाचे सर्कल इंस्पेक्टर होते. आज वर्मा परिवार राहत असलेले वणीतील घर परदेशी यांचे त्यावेळी राहते घर होते. शहराच्या आजुबाजुला त्यांची शेकडो एकर शेतजमीन होती. पत्नी लक्ष्मीबाईसह ते याच घरात वास्तव्यास होते. इंग्रज राजवटीत उच्चपदावर असल्याने परदेशी परिवार सुखासिन जीवन जगत होता. मात्र या दाम्पत्याच्या जीवनात एक दुःखाचा पदरही होता. मूळचे मध्यप्रदेशातील हे दाम्पत्य निपुत्रीक होते. इटारसीचे माहेर असलेल्या लक्ष्मीबाईंनी त्यासाठी वणीतील आपल्या राहत्या घरासमोरच या राममंदिराची उभारणी केली. त्यासाठी थेट अयोध्येहून मूर्ती मागविल्या. निपुत्रिक असलेल्या परदेशी दाम्पत्याला कालांतराने मंदिराच्या व्यवस्थापनाची चिंता भेडसावू लागली. अखेर त्यांनी आपल्याच नात्यातील बैतूल येथील नंदकिशोर वर्मा (परदेशी) यांना दत्तक देऊन स्वतःजवळ ठेऊन घेतले. नंदकिशोर वर्मा हे देखील आज हयात नसून त्यांची दुसरी व तिसरी पीढी मात्र या मंदिराचे व्यवस्थापन पूजा अर्चना नवरात्रासह पूर्वापार चालत आलेल्या परंपरेत कोणताही बदल न करता यथोचितपणे पार पाडीत आहे.

मध्यवस्तित असलेले हे मंदिर खासगी असले तरी समस्त वणीकरांचे श्रद्धास्थान ठरले आले. 1980 -81 च्या सुमारास राम नवमी शोभायात्रेला छोट्या रुपात सुरूवात झाली. गेल्या काही वर्षांत मात्र या शोभायात्रेला भव्यता आली असून ती संपूर्ण शहराची झाली आहे. गुडीपाडव्यापासून रामनवमी पर्यंतचे संपूर्ण नऊ दिवस हे मंदिर विविध कार्यक्रमांनी गजबजलेले असते.

Comments
Loading...