अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्व ठेविदारांच्या ठेवी सुरक्षीत – ऍड देविदास काळे

संभ्रम की राजकारण? काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या....

विवेक तोटेवार, वणी: परिसरातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशी संस्था म्हणून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव घेतले जाते. सध्या या पतसंस्थेबाबत विविध अफवा पसरवून ठेविदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र ठेविदारांचे पैसे सुरक्षीत असून ज्या सभासदांना पैसे हवे आहे. त्यांना नियमाप्रमाणे त्यांचे पैसे परत देण्याची तजवीज आम्ही केली आहे. पण ठेविदारांनी आपले 7 टक्क्यांचे नुकसान करून रक्कम काढू नये, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ऍड देविदास काळे यांनी सभासदांना केले आहे.

प्रकरणाची सुरूवात कशी झाली?
दैनिक अभिकर्ते हे पतसंस्थेमार्फत ठेवी गोळा करतात. या बदल्यात पतसंस्थेद्वारा दैनिक अभिकर्त्यांना कमिशन स्वरूपात मोबदला दिला जातो. दैनिक अभिकर्ते हे कायमस्वरुपी कर्मचारी नसले तरी ते ठेविदार आणि पतसंस्थेमधला दुवा असतात. वरोरा येथील काही अभिकर्ते हे एकाच वेळी दोन संस्थेत काम करीत होते. दरम्यान या दैनिक अभिकर्त्यांनी ठेविदारांना दुस-या पतसंस्थेत चांगला व्याजदर असल्याचे सांगत ठेविदारांची दिशाभूल करण्यास सुरूवात केली. तसेच रंगनाथ स्वामी पतसंस्थेतील ठेवी बंद करून दुस-या पतसंस्थेत ठेवी ठेवण्यास प्रवृत्त करण्याचे प्रकार सुरू केले.

या प्रकाराची माहिती संचालक मंडळाला मिळाली. सदर अभिकर्त्यांचे काम हे संस्थेविरोधात असल्याने संस्थेनी त्यांना वैयक्तिक नोटीस दिली. त्यावर समाधानकारक खुलासा न आल्याने त्यांना संस्थेने कामावरून कमी केले. विशेष म्हणजे 2011 ते 2022 या कालावधीत या अभिकर्त्यांनी लाखोंचे कमिशन घेतले आहे. यात एक अभिकर्त्यांचे कमिशन हे 65 लाख, एकाचे 38 लाख तर एकाचे 34 लाख पेक्षाही अधिक होते. चांगली पतसंस्था व त्यातून मिळणारे लाखोंचे कमिशन हातातून जात असल्याने अभिकर्त्यांनी पुन्हा कामावर घेण्याची संचालक मंडळाला विनंती केली.

दुसरे प्रकरण अफरातफरीचे
संस्थेत वणी येथील एक कर्मचारी 2008 पासून 2022 पर्यंत पूर्णवेळ नोकरीला होता. मध्यंतरीच्या काळात त्याने पैशाची अफरातफर सुरू केल्याची कुणकुण संस्थेला लागली. त्यावरून त्यांनी या अफरातफरीची चौकशी केली असता सदर कर्मचा-याने पैशाचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांना खुलासा मागवण्यात आला. या खुलाशात सदर कर्मचा-याने चूक कबूल करून जो आर्थिक भुर्दंड संस्थेला बसला तो व्याजासह परत केला. शिवाय यापुढे अशी चूक होणार नाही व माझी शिक्षा माफ करावी व मला नोकरीत घ्यावे अशी विनंती केली. मात्र संस्थेने सदर कर्मचा-याला कामावर परत घेतले नाही.

कामावरून कमी केलेले दैनिक अभिकर्ते व बडतर्फ कर्मचारी एकत्र
वरोरा येथील दैनिक अभिकर्त्यांचे संस्थेने काम काढून घेतल्याने त्यांना लाखोंचा आर्थिक फटका बसला. दरवर्षी कमिशनपोटी मिळणा-या लाखोंच्या कमिशनवर पाणी फिरले. ही सल त्यांच्या मनात होती. दरम्यान बडतर्फ कर्मचारी याला कामावर न घेतल्याने त्याने देखील संस्थेविरोधात दंड थोपटले. यात त्यांना काही लोकांकडून राजकीय बळ मिळाले. अखेर काही अभिकर्ते व बडतर्फ कर्मचारी यांनी आकसेपोटी संस्थेविरोधात यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी संस्थेविरोधात बिनबुडाचे व तथ्यहिन आरोप करीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पतसंस्था ही केवळ विश्वासावर सुरू असते. ऍड देविदास काळे यांनी 33 वर्षांपूर्वी एका 10 बाय 10 च्या खोलीतून ही पतसंस्था सुरू केली. आज या पतसंस्थेकडे 15 शाखा व 2 स्वत:च्या मालकीच्या इमारती आहे. हे केवळ एका दिवसांमध्ये झाले नाही. ठेविदारांचा कमावलेला विश्वास व ऍड देविदास काळे यांच्यासह संचालक मंडळाचे परिश्रम यामुळे एका छोट्या रोपट्याचे आज वटवृक्ष झाले आहे. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, सहकार क्षेत्रातील घडामोडी या सर्वांचा समतोल साधून संस्थेने ही प्रगती केली आहे.

ज्या संस्थेत आपण काम करतो त्याचा मोबदला पगार किंवा कमिशन द्वारा काम करणा-यांना मिळत असतो. ज्या संस्थेच्या भरवश्यावर आपली रोजी रोटी आहे. तिथे प्रामाणिक कामाची अपेक्षा असते. मात्र याचा विसर बडतर्फ कर्मचारी व अभिकर्त्यांना पडला. ज्या संस्थेतून लाखोंचे कमिशन मिळत आहे. त्याच संस्थेतील ठेविदारांना दुस-या संस्थेकडे वळवण्याचा प्रयत्न अभिकर्त्यांनी केला. तर एका कर्मचा-याने अफरातफर केली. भ्रष्ट, संस्थेची बदनामी करणे, ठेविदारांना दुस-या पतसंस्थेकडे वळवणे अशा गंभीर गोष्टी समोर आल्यावर कोणताही संस्था ही याबाबत कार्यवाही करते. तेच रंगनाथ येथे झाले. अशा लोकांकडून काम काढण्यात आले. मात्र आता कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने हे विरोधक एकत्र आले. त्यांना काही असंतृष्ट विरोधकांची साथ मिळाली व त्यांनी संस्थेविरोधात बदनामीचे कारस्थान सुरू केले आहे. त्यामुळे या प्रकरणी उलट्या बोंबा सुरु असल्याचे देखील बोलले जात आहे. 

ठेविदारांच्या ठेवी सुरक्षीत – ऍड देविदास काळे, अध्यक्ष
रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्था ही ग्राहकांच्या विश्वासावर टिकून आहे. संस्थेमध्ये काही गैरव्यवहार असते तर ही संस्था इतकी मोठी झाली नसती. आजही आम्ही ठेविदारांनी जो विश्वास टाकला आहे त्याच बळावर कार्य करीत आहोत. संस्थेमध्ये कोणतीही अनियमीतता नाही. ठेवीदारांच्या ठेवी आमच्याकडे सुरक्षीत आहे. ज्या सभासदांना पैसे हवे आहे. त्यांना नियमाप्रमाणे त्यांचे पैसे परत देण्याची तजवीज आम्ही केली आहे. मात्र ग्राहकांनी ठेवी काढून आपले नुकसान करू नये. शिवाय संस्थेशी दगाबाजी करणारे व अफरातफर करणा-यांवर विश्वास ठेवू नये अशी मी ठेविदारांना विनंती करतो.

Comments are closed.