जितेंद्र कोठारी, वणी: लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच एक युवक मागील एका वर्षापासून शारीरिक शोषण करीत असल्याची तक्रार तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील अल्पवयीन आदिवासी तरुणीने वणी पो.स्टे. मध्ये नोंदविली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुरज रवींद्र मुसळे (28), रा. मारेगाव (कोरंबी) ता. वणी याला अटक करून वणी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीस 2 दिवसाची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
नमूद तक्रारीनुसार आरोपी सुरज मुसळे याने 2017 मध्ये पीडितेसोबत ओळख करून प्रेम संबंध स्थापित केले. दोघांचे सूट जुळल्याची कुणकुण कुटुंबियांना लागताच दोन्ही कुटुंबामध्ये भांडण झाले. अखेर ग्रामवासी व तंटामुक्ती समितीच्या मध्यस्थीने वाद मिटवून आरोपी सुरज मुसळे यांनी अल्पवयीन तरुणी सोबत लग्न करणार असे कबूल करून स्टॅम्प पेपरवर लिहून दिले. या नंतर फेब्रुवारी 2019 पासून पीडित तरुणी व आरोपी सुरज दोघेही लिव्ह इन मध्ये राहून गावातच संसार मांडला.
तरुणीच्या तोंडात टाकले विषारी द्रव्य
दि.25 मे रोजी दुपारी युवती गावातच आपल्या आईच्या घरी गेली असता तिचा पार्टनर सूरजने तू आईच्या घरी का गेली असे म्हणून मारहाण केली. एवढेच नव्हे तर आरोपीने पीडितेला जीवे मारण्याच्या उद्देशाने जमिनीवर पटकून तिच्या तोंडात विषारी औषध टाकून दिले. विषारी औषध पोटात गेल्यामुळे युवती बेशुद्द झाली. त्यामुळे घाबरलेले आरोपीने स्वतःहून तिला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
सायंकाळी तरुणीला शुद्दी आल्यावर आरोपी तिला घेऊन परत गावी गेला. मात्र 26 मे रोजी पीडित अल्पवयीन तरुणी आपल्या आई वडिलांसोबत वणी पो.स्टे. पोहचली व आरोपी सुरज रवींद्र मुसळे विरुद्द बलात्कार व जीवे मारण्याचे प्रयत्न करण्याची तक्रार दाखल केली.
पीडित युवती अल्पवयीन व आदिवासी समाजाची असल्यामुळे आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) कायद्यासह अट्रोसिटी तसेच कलम 363, 366 (अ), 344, 376 (2), 307, 506 व सहकलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपीला आज वणी न्यायालयात हजर करून 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळविली आहे. प्रकरणाची तपास उप विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक करीत आहे.