घराची देखभाल करणाऱ्या दलित महिलेवर बलात्कार
बलात्कार करून महिलेच्या अंगावर नराधमाने फेकले पैसे
सविस्तर वृत्त असे की की वणी तालुक्यातील पळसोनी येथील तरुण दाम्पत्य कामानिमित्त वणी शहरात राहायला आले होते. रवि नगर भागात राहणारे डॉ भागवत हे मुंबईत असल्याने त्यांच्या घराच्या देखभालीचे आणि साफसफाईचे काम ते करतात. घराची देखभाल करून ते तिथेच एका खोली राहतात. सोबतच डॉ भागवत यांनी त्यांच्या घराकडे लक्ष ठेवण्याचे काम रंगारीपुरा भागातील त्यांचा एक मित्र करीत होता.
सोमवारी सकाळीच डॉ भागवतचा मित्र विलास आनंदराव गौरकार (45) हा रोज सकाळी भागवत यांच्या कुत्र्याला जेवण देण्यासाठी आणि घराची पाहणी करायसाठी यायचा. त्यामुळे त्यांची पीडितेशी आणि तिच्या पतीशी तोंडओळख होती. सोमवारी सकाळी विलास नेहमीप्रमाणे भागवत यांच्या कुत्र्याला जेवण देण्यासाठी भागवत यांच्या घरी आला. त्याने घरमालकाचा मुलगा एकदोन दिवसात येणार आहे, तेव्हा घराची छान साफसफाई करून ठेव असे पीडित महिलेला सांगीतले. त्यावरून सदर महिलेने साफसफाई करायला सुरुवात केली. तितक्यात विलासने परत आवाज दिला व चहा बनवायला सांगितला.
मालकाच्या मित्राने चहा बनवण्यास सांगितल्याने पीडित महिला स्वतःच्या खोलीकडे चहा बनविण्यासाठी निघाली, तेव्हा तिला थांबवून घरमालकाच्या घरातच चहा तयार करण्यास सांगितले. विलासला चहा तयार करून दिला. चहा पिल्यानंतर विलासने तिला घराची झाडझुड करायला सांगितले. सदर महिला झाडायला लागली. झाडत झाडत ती घरमालकाच्या बेडरूममध्ये जाताच विलास मागाहून आला अन त्या महिलेला घट्ट पकडले. तिच्यासोबत त्याने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यावेळी पीडितेने ओरडण्याचा व प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र विलासने तिचे तोंड दाबून ठेवल्याने तिचा आवाज घराबाहेर पडला नाही. बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर विलासने पीडित महिलेच्या अंगावर पाचशे रुपयाच्या दोन नोटा फेकून मारल्या. तसंच या प्रकाराची कुणाजवळ वाच्यता करू नको अशी धमकी दिली. पीडित महिलेने दोन्ही नोटा जाळून टाकल्या आणि ती रडत रडत आपल्या खोलीत गेली.
या घटनेने पीडित महिला पुरती घाबरून गेली होती. तिने रडत रडत आपल्या पतीला फोनवर या घटनेची माहिती दिली. पतीने तिला समजावून सांगत आपण पोलिसात जाऊ असे सांगून शांत केले व पोलीस ठाण्यात येऊन विलास आनंदराव गौरकार विरुद्ध पोलिसात तक्रार दिली.
या घटनेचा प्राथमिक तपास ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी सुरू केला होता. पीडित महिला अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने विलास विरुद्ध बलात्कार तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पत्नीची प्रसूती झाल्याचे कारण सांगून, तसंच पीडितेचे एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने बलात्कार केला आहे. बातमी लिहिपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसंच लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणार आहे.