बहुगुणी डेस्क, वणी: रासा येथे मध्यरात्री मारहाणीची थरारक घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर आलेल्या टोळीने लाकडी काठ्यांनी महिलेसह दोन पुरुषांवर हल्ला केला. यात ते जखमी झाले. जुन्या कौटुंबिक वादातून झालेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तक्रारदाराच्या सुनेच्या भावासह आणखी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात देखील या प्रकरणातील मुख्य आरोपीने त्याच्या मेहुण्याला बेदम मारहाण करीत त्याचे अपहरण केले होते. तर यावेळी त्याने बहिणीची सासू, सासरे व दीर यांना मारहाण केली.
तक्रारीनुसार, प्रकाश मारोती शिंदे (वय 50) हे रासा ता. वणी येथील रहिवासी असून ते मजुरी करतात. त्यांना दोन मुलं असून एकाचे लग्न झाले आहे. आधी त्यांचे एकत्र कुटुंब होते. मात्र मुलासोबत पटत नसल्याने तो त्याच्या पत्नीसह वेगळा राहतो. तर प्रकाश हे पत्नी व लहान मुलासह राहतात.
दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास प्रकाश शिंदे, त्यांची पत्नी गंगुबाई आणि मुलगा उमेश घरी झोपले होते. दरम्यान त्यांच्या सुनेचा भाऊ मोहन कुचनकर हा त्याच्या दोन ते तीन साथीदारांसह शिंदे यांच्या घरासमोर आला. घरासमोर येऊन ते गोंधळ घालत होते. मोहन हा बहिणीला शिवीगाळ आणि मारहाण का करता असा जाब विचारत होता. गोंधळ ऐकून गंगुबाई या झोपेतून उठल्या व घराबाहेर आल्या.
मोहनने तिला बहिणीला त्रास का देतात असे म्हणत लाकडी काठीने मारहाण केली. दरम्यान प्रकाश आणि उमेश हे मध्ये पडले असता मोहन आणि त्याच्या साथीदारांनी त्यांनाही काठीने मारहाण केली. यात प्रकाश व गंगुबाई जखमी झालेत. तर उमेशच्या डोक्याला जखम झाली. मारहाणीनंतर आरोपी मोहनने बहिणीला त्रास दिल्यास पुन्हा मारहाण करणार, अशी धमकी दिली व सर्वांनी पळ काढला.
मारहाणीच्या घटनेची पार्श्वभूमी
प्रकाश यांच्या मुलाचा त्यांच्या सुनेच्या लहान बहिणीशी साखरपुडा झाला होता. मात्र त्यांच्या लहान मुलाला दारुचे व्यसन असल्याची बाब माहेरच्या व्यक्तींना माहिती झाली. त्यावरून हे लग्न मोडले. लग्न मोडल्यानंतर प्रकाश यांच्या मोठ्या मुलाने त्याच्या पत्नीला शिविगाळ केली होती. मात्र तिने ही बाब माहेरी जात तिच्या भावाला सांगितली. बहिणीला शिविगाळ केली म्हणून मध्यरात्री तिच्या भावाने गावात येऊन मेहुण्याला बेदम मारहाण केली व त्याचे अपहरण केले होते. मार्च महिन्यातही ही घटना आहे. याबाबत तेव्हा तक्रार करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांचा मुलगा व सून हे वेगळे राहतात.
प्रकाश शिंदे यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ आरोपी मोहन केशव कुचनकर (वय 30, रा. वरोरा, जि. चंद्रपूर) आणि त्याच्या दोन ते तीन अज्ञात साथीदारांविरुद्ध वणी पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस कलम 118(1), 3(5), 351(2), 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



Comments are closed.