गतीअवरोधकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रस्ता रोको आंदोलन

सोमवारपासून गतीअवरोधकाच्या कामाला सुरूवात

0

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे चिखलगाव येथील यवतमाळ रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या अपघातात एका जणांचा जीव गेला व दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना घडण्याचे  कारण म्हणजे गतीअवरोधक नसणे हे हेरून राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. आंदोलन यशस्वी होऊन सोमवार पासून गतीअवरोधकाचे काम सुरू करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंत्यांनी दिले आहे.

सविस्तर वृत्त असे की, गेल्या 15 वर्षांपासून चिखलगाव ग्रामवासी सदर रोडवर गतीअवरोधकाचे मागणी करीत आहे. परंतु मागणीकडे राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या रस्त्यावर अनेकदा अपघात झाले त्यामध्ये निष्कारण निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यातच शुक्रवारी चिखलगाव येथे एक ट्रकचा अपघात झाला. ज्यात एक इसमाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. अशा  घटना घडू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने  डॉ महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात गतीअवरोधकाची मागणी उचलून धरली. त्या अनुषंगाने शनिवारी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत चिखलगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी सां. बा. विभागाच्या अभियंत्यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीचे गतीअवरोधकाचे निवेदन स्वीकारले. व सोमवारपासून कामास सुरवात करणार असल्याची माहिती दिली. सदर गतीअवरोधक हे तीन ठिकाणी बनविण्यात येणार आहे . त्यामध्ये कातकडे शाळा, बसस्थानक, व बोधेनगर या ठिकाणी गतीअवरोधक लावण्यात येणार असल्याची माहिती रवींद्र मालवण वरिष्ठ अभियंता सां. बां. वि यांच्याकडून देण्यात आली आहे.

नियमानुसार शाळा व महाविद्यालय असलेल्या ठिकाणी गतीअवरोधक असणे आवश्यक आहे. परंतु नियमाला केराची टोपली दाखवीत सत्ताधाऱ्यांचे काम सुरू आहे. इतका गंभीर सामाजिक व लोकोपयोगी विषय असतानाही आंदोलनात एकही स्थानिक कार्यकर्ता उपस्थित नव्हता. डॉ लोढा यांनी गतीअवरोधकाची मागणी उचलून धरली व ती मान्यही करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व डॉ लोढा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकार, राजू उपरकर, राजाभाऊ बिलोरिया, शम्स् सिद्धीकी, राहुल झट्टे, धनराज, रोहित, दशरथ शेंडे, मारोती मोहाडे, गोपीचंद आहुजा, आवेश तालावार व शेकडो चिखलगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.