रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लालगुडा चौपाटीवर रास्ता रोको आंदोलन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा ते भालर व भालर ते तरोडा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी लालगुडा चौपाटीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. लालगुडा, भालर, लाठी, निवली, तरोडा, बेसा, निलजई येथील गावकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी खड्डे तात्काळ बुजवण्यात येईल असे आश्वासन आंदोलकांना दिले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम टेंडर प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.
लालगुडा ते भालर व भालर ते तरोडा हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वणी यांच्या अखत्यारित येतो. या रस्त्यावर धोपटाळा, भालर, बेसा, लाठी, निवली, तरोडा, निलजई ही गावे आहेत. या गावातील व आजुबाजुच्या परिसरातील नागरीक शेती, शेतीपुरक कामे, नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरीता या रस्त्याने ये-जा करतात. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असून रस्त्यावरील गिट्टी उखडलेली आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊ प्रवास करावा लागत आहे.
अपघाताचे प्रमाण वाढले
रस्त्याची दुरवस्था असल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे. शाळकरी मुलांना आणि गर्भवती महिलांना तर भयंकर त्रास होतो. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी साचते. त्यामुळेही अपघाताची शक्यता आहे. यापूर्वी सुद्धा अनेकदा अपघात झालेले असून अनेकांनी प्राण गमावले आहे. हा मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासन या मार्गावरील खड्डे बुजवून मार्ग दुरुस्त करुन सुरळीत करुन देण्याचे सौजन्य दाखवत नाही. त्यामुळे परिसरातील जनतेमध्ये प्रशासकीय यंत्रणा व अधिकाऱ्यांबद्दल प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे.
या रस्त्याबाबत दिनांक 8 मार्च रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर 4 एप्रिल रोजी पुन्हा निवेदन देण्यात आले होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतुन रस्ता मंजूर असून लवकरच नविन रस्ता बनवून मिळेल असे उत्तर प्रशासनाकडून मिळालेले आहे. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्त्वात रास्ता रोकोचा मार्ग अवलंबला.
Comments are closed.