अखेर तिची रेड लाईट एरियातून सुटका

गेल्या आठ दिवसांपासून मुलगी होती फरार...

0

विवेक तोटेवार, वणी: ती वणीतील रेड लाईट एरियात वेश्याव्यवसाय करायची… मात्र गेल्या आठवड्यात तिने लग्न पळून लग्न केले… कुंटनखान्यातील लोक, पोलीस तिचा शोध घेत होते… तर ती आणि तिचे पती दोघंही लपतछपत दिवस काढत होते… अखेर त्यांचा शोध लागला… राजस्थान पोलीस तिला घ्यायला वणीत आले… मला पाठवू नका… मला पुन्हा वेश्याव्यवसायात जायचे नाही, मला वाचवा, मला या दलदलीतून बाहेर काढा अशी वणी पोलिसांना विनवणी करत होती… ही कहाणी आहे वेश्याव्यवसाय सोडून सुखी संसाराची स्वप्न पाहणा-या एका तरुणीची….

सोनू (नाव बदललेले आहे) ही तेवीस वर्षांची तरुणी आहे. ती मुळची राजस्थानची. घरी अठराविश्व दारिद्र्य. दिसायला सुंदर आणि देखण्या असलेल्या सोनुची तिच्या पालकांनी विक्री केली व तिला देहव्यवसायात ढकलले. गेल्या तीन वर्षांपासून ती
वणीतील रेडलाईट एरियात देहविक्रीचा व्यवसाय करायची. त्यातून तिची जी कमाई व्हायची त्यातील 15-20 हजार रुपये ती घरी पाठवायची. मात्र तिच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की त्याने तिचे सर्व आयुष्यच बदलून गेले.

सोनूच्या आयुष्यात सुनीलची (नाव बदललेले आहे) एन्ट्री झाली. सुनील हा वणीत राहणारा एक तेवीस वर्षीय तरुण आहे. त्याची सोनुशी ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांची जात धर्म वेगळा, भाषा वेगळी मात्र प्रेमात या सर्व गोष्टी गौण ठरतात. त्या दोघांनी सोबत जगण्या मरण्याच्या आणाभाका घेतल्या. तिने वेश्याव्यवसायाचा कायमचा त्याग करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे लग्न करणे काही तितके सोपे नव्हते.

एकदा कुंटनखान्यात आलेल्या मुलीला येण्याचा मार्ग तर खुला असतो. मात्र तिथून बाहेर पडण्याचा मार्ग तेवढाच कठीण. अखेर आठ दिवसांआधी सोनू आणि सुनीलने पळून जाऊन लग्न केले. दुसरीकडे कुंटनखान्यातील लोक सोडणार नाही याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी लपत छपत कसे बसे भीतीच्या सावटाखाली आठ दिवस काढले.

दरम्यान मुलगी पळून गेल्याचा निरोप सोनुच्या पालकांना कळला. आता दर महिन्याला येणारे पैसे बंद होणार याची चिंता त्यांना सतावू लागली. त्यामुळे त्यांनी राजस्थान येथील पोलीस ठाण्यात मुलगी घरून महाराष्ट्रात पळून गेल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून राजस्थान पोलिसांनी 23 ऑक्टोबर मंगळवारी वणी पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान पोलीस शोध घेत असल्याची माहिती सोनू आणि सुनिलला मिळाली. त्यामुळे आधीच भितीच्या सावटाखाली जगणा-या या जोडप्याने वणी पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याचा निर्णय घेतला.

राजस्थान पोलीस आणि जोडपे पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच तिथे एक वेगळेच नाट्य घडले. राजस्थान पोलीस मुलीला बयान देण्यासाठी कोर्टात हजर करण्याचा आदेश घेऊन आले होते. त्यामुळे ते मुलीला राजस्थानला घेऊन जाण्यावर ठाम होते. तर मुलगी राजस्थानला जाणार नाही. गेल्यास मला पुन्हा वेश्याव्यवसायात ढकलले जाईल असे सांगत मला राजस्थानला पाठवू नका अशी वणी पोलिसांना विनवणी केली.

वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी समयसुचकता दाखवत अखेर यावर तोडगा काढला. मुलगी सज्ञान असून तिने स्वत:च्या मर्जीने लग्न केले असल्याने तिला घेऊन जाता येणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. जर कोर्टाला मुलीचे
बयान हवे असल्यास तिचे लिखित व व्हिडीओ रेकॉर्डिंगद्वारा बयान घेऊन जावे असा मार्ग त्यांनी सुचवला. जोपर्यंत राजस्थान पोलिसांनाही सर्व प्रकार लक्षात आला होता. त्यांनी खाडे यांचा प्रस्ताव मान्य केला व ते राजस्थानला परत गेले.

आज सोनुला सुनीलमुळे एक आधार मिळाला आहे. दोघांना भावी आयुष्यासाठी वणी पोलिसांनी शुभेच्छा देत सर्व संरक्षण देण्याचं वचन दिलं. त्यामुळे त्यांनी वणी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे एका मुलगी पुन्हा देहविक्रीच्या व्यवसायात जाण्यापासून वाचली. त्यामुळे वणी पोलीस नक्कीच कौतुकास पात्र ठरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.