मृतकाच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, दवाखान्याची तोडफोड

मृतकाचे शव घेऊन नातेवाईक पोहोचले दवाखान्यात, चुकीच्या उपचाराने मृत्यू झाल्याचा आरोप

0

विवेक तोटेवार, वणी: उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी शहरातील एका डॉक्टरला बेदम मारहाण केली तसेच दवाखान्याची प्रचंड नासधूस व तोडफोड केली. आज दुपारी 3 ते साडे 3 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण व तोडफोड करणा-या काही व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. चुकीच्या उपचारामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वणीतील जत्रा रोड परिसरात डॉ पदमाकर मत्ते यांचा दवाखाना आहे. सोमवार 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मृतक आकाश हनुमान पेंदोर (24) रा. रंगनाथ नगर वणी हा आजारी असल्याने तपासणीसाठी डॉ. मत्ते यांच्या दवाखान्यात गेला होता. डॉक्टरांनी त्याला तपासले व त्याच्यावर उपचार केला. मात्र घरी परत आल्यावर काही वेळाने आकाशची प्रकृती अधिक खालावली.

प्रकृती खालावल्याने आकाशला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो पर्यत आकाशचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी आकाशला मृत घोषीत केले. त्यामुळे संतप्त झालेले मृतकाचे नातेवाईक व मित्र शव घेऊन डॉ मत्ते यांच्या रुग्णालयात निघाले. दुपारी 3 ते साडे तीन वाजताच्या दरम्यान ते डॉ. मत्ते यांच्या दवाखान्यात पोहोचले.

दवाखान्यात पोहोचल्यावर मृतकाच्या नातेवाईकांनी व मित्रांनी डॉ. मत्ते यांना बेदम मारहाण केली. तसेच दवाखान्याची तोडफोड केली व तिथल्या वस्तूंची नासधूस केली. या प्रकाराची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांची चमू तिथे तात्काळ पोहोचली व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

चुकीच्या उपचाराने मृत्यू झाल्याचा आरोप
आकाश जेव्हा प्रकृती दाखवण्यासाठी दवाखान्यात गेला तेव्हा त्याला डॉक्टरांनी दोन लस व एक टॅबलेट दिली, असे आकाशच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. चुकीच्या उपचारामुळेच आकाशचा बळी गेला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. सध्या पोलिसांनी दवाखान्यापुढे दोन कर्मचारी नियुक्त केले आहे.

पोलिसांनी तोडफोड व मारहाण करणाऱ्या काही व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. आकाशचे शव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहेतपर्यत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Leave A Reply

Your email address will not be published.