सालेभट्टी येथील सार्वजनिक शौचालयाचे उर्वरित काम सुरू

संपूर्ण कामाची सखोल चौकशीची गंगाधर महाराज यांची मागणी

0

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव पंचायत समिती अंतर्गत सालेभट्टी गावात सार्वजनिक शौचालयाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असून या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची बातमी ‘वणी बहुगुणी’ने दि. 4 जुलै रोजी प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि दुस-याची दिवशी सोमवारी 5 जुलै पासून शौचालयाचे अर्धवट सोडण्यात आलेल्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

स्वच्छ भारत अभियान योजने अंतर्गत 2019- 20 मध्ये सालेभट्टी येथे सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी 2 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत सदस्याचे नातलग असलेले एका कंत्राटदाराने गावात महिला पुरुष शौचालय बांधकामाचे काम केले. मात्र अर्धवट व निकृष्ट कामे करुन शासनाला चुना लावण्यात तरबेज असलेल्या सदर ठेकेदाराने सालेभट्टी येथेही आपले कृतत्व दाखवले. शौचालयासाठी मलनिस्सारण पाईपलाईन, शोष खड्डा, पाण्याची टाकी व नळ फिटिंगचे काम न करता त्यांनी कामाची 90 टक्के रक्कम उचलल्याची माहिती आहे.

सार्वजनिक शौचालयासह गेल्या 3 वर्षात गावाच्या विकासासाठी विविध फंडातून मंजूर कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप गावकऱ्यांनी केले आहे. सामाजिक कार्यकर्ता गंगाधर महाराज लोनसावळेसह शेकडो गावकऱ्यांनी सीईओ व आमदार याना निवेदन देऊन झालेल्या कामाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच ‘त्या’ ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याची मागणीही केली आहे.

‘वणी बहुगुणी’ची बातमी येताच कामाला सुरूवात

वणी बहुगुणीचे आभार: गंगाधर महाराज
सालेभट्टी येथील सार्वजनिक शौचालय व इतर कामाबाबत वणी बहुगुणीने सविस्तर बातमी प्रकाशित केल्यामुळे अर्धवट कामास सुरवात करण्यात आली आहे. त्यासाठी आम्ही ग्रामस्थ वणी बहुगुणीचे आभारी आहोत. मात्र सर्व कामाची सखोलपणे चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही करण्याची आमची मागणी आहे. तसेच अर्धवट सोडण्यात आलेल्या कामाची रक्कम ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावी.
: गंगाधर महाराज, ज्येष्ठ समाजसेवक

हे देखील वाचा:

सालेभट्टी येथील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामातही गैरप्रकार

वणीतील महात्मा फुले चौकात घाणीचे साम्राज्य

Leave A Reply

Your email address will not be published.