मध्यरात्री कत्तलीसाठी तेलंगणात नेणा-या 30 जनावरांची सुटका

8 आरोपींना अटक तर 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कत्तलीसाठी तेलंगणात येणा-या 30 गोवंशाची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली. रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. यातील पहिली कारवाई ही येडशी जवळ तर दुसरी कारवाई ही मांगली चौपाटी जवळ करण्यात आली. एका कारवाईत 13 जनावरांची तर दुस-या कारवाईत 17 जनावरांची सुटका करण्यात आली. या दोन्ही कारवाईत सुमारे साडे 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 8 आरोपींविरोधांत मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहिती नुसार, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चे पथक रविवारच्या मध्यरात्री (दिनांक 4 डिसेंबर) मुकुटबन परीसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खबरीकडून गोवंश तस्करीची टीप मिळाली. माहितीच्या आधारे शोध घेत असताना पहाटे 2.55 वाजताच्या दरम्यान मुकुटबन ते येडशी रोड रोडच्या बाजूला एक पिकअप वाहन (TS-10-UB-8687) उभे दिसले. पथकाने पिकअप वाहनाजवळ जाऊन पाहिले असता तिथे चार इसम उभे दिसले.

पथकाने वाहनाच्या मागील माल साठवणूक करण्याच्या जागेची पाहणी केली असता तिथे 13 बैल-गोरे दाटीवाटीने, आखुड दोरीने निर्दयतेने बांधलेले आढळले. तसेच त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था न करता कोंबल्याचे दिसून आले. सदर जनावरे कोणाची आहेत याबाबत चौघांना विचारणा केली असता त्यातील फयाम गफार शेख याने हे गोवंश स्वतःचे असून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेत असल्याचे सांगीतल्याने.

पथकाने आरोपी फयाम गफार शेख वय ३२ वर्षे रा. वार्ड क्र. ४, मुकुटबन, ता. झरीजामणी, सद्दाम ऊर्फ सय्यद शाकीब सय्यद महमुद वय ३२ वर्षे रा. चिखलवर्चा ता. घाटंजी, संदीप निंबाजी सोयाम वय ४९ वर्षे रा. पिपरडवाडी, ता. झरीजामणी, राजु निंबाजी सोयाम वय २५ वर्षे रा. पिंपरडवाडी, ता. झरीजामणी यांना अटक केली. वाहनातून एकुण 13 गोवंशीय जनावरे व वाहन असा एकूण ४ लाख ६५ रूपयांचा मुददेमाल ताब्यात घेतला.

दुसरी कारवाई मांगली चौपाटीजवळ
खडकी गणेशपूर येथून काही इसम हे बैलांना (पायदळ) मांगली मार्गे तेलंगना राज्यात कत्तली करीता घेवून जात असल्याची टीप स्थानिक गुन्हे शाखेला पेट्रोलिंग दरम्यान मिळाली. त्यावनरून पथक मांगली चौपाटी येथे थांबून असताना त्यांना 4 इसम हे बैलांचा एक कळप घेऊन येताना दिसले. ते पुराणीने टोचत, काठीने मारत बैलांना घेऊन येत होते.

पथकाने त्यांना थांबवून सदर जनावरे कोणाचे मालकीचे आहेत याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरची जनावरे ही अस्लम कुरेशी व सलीम कुरेशी रा. बेला जि. आदीलाबाद (तेलंगणा) यांचे मालकीची असल्याचे सांगून त्याचेकडेच पोहोचवत असल्याचे सांगितले. वरुन त्यांचेजवळुन एकुण १७ नग बैल व एक मोबाईल असा एकुण १,७५,०००/ रुपयाचा माल ताब्यात घेतला. या प्रकरणी सचिन महादेव थेरे वय ३८ वर्षे रा. तुंड्रा, ता. वणी, देविदास नानाजी भोसकर वय ४५ वर्षे, रा. तुंड्रा, ता. वणी, रमेश शालीकराव पेन्दोर वय ४१ वर्षे रा. तुंड्रा, ता. वणी, शत्रुघ्न नथ्थु घोरफळे वय ४५ रा. तुंड्रा, ता. वणी यांना ताब्यात घेतले.

या दोन्ही प्रकरणातील 8 आरोपीतांविरुध्द पो.स्टे. मुकुटबन येथे भादंविच्या कलम ३४,४२९ ; प्राण्‍यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमच्या – 11(1)(c),11(1)(d),11(1)(g),11(1)(i),11(1)(j),11(1)(k) ; महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम 119 ; महाराष्‍ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा)अधिनियम,१९९५ – ५अ, ५ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणात सुटका केलेल्या गोवंशीय जनावरांची सुश्रुशा व सुरक्षेच्या दृष्टीने गौरक्षण संस्थान रासा ता. वणी येथे ठेवण्यात आले आहेत. पुढील तपास पो.स्टे. मुकुटबन कडुन सुरु आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप, पो. नि. स्थागुशा आधारसिंग सोनोने, यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, अमोल मुडे, पोहवा योगेश डगवार, सुनिल खंडागळे, पोना सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, पोकों रजनिकांत मडावी, चापोना सतिश फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.