मारेगाव: निवडणुकीच्या आरक्षणामुळे अनेक नेत्यांचे बिघडले गणित

सर्वसाधारण गणावर पडणार उमेदवारांच्या उड्या

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या गट व गणाचे आरक्षण जाहीर झाले आहे. तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट तसेच चार पंचायत समितीचे गण आहेत. यापैकी कुंभा-मार्डी जि. प. गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेला आहे. तर बोटोनी-वेगाव गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेला आहे. पंचायत समितीमध्ये कुंभा गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव, मार्डी पंचायत समिती गण सर्वसाधारण, बोटोनी गण अनुसूचित जमाती महिला तर वेगाव गण नामाप्र साठी राखीव झालेला आहे. आरक्षणामुळे काहींचे राजकीय गणित बिघडले आहेत. तर काहींना मात्र लॉटरी लागली आहे. 

सद्य स्थितीत वेगाव-बोटोनी जि. प. गटामध्ये अनिल देरकर नेतृत्व करीत आहेत. हा गट आता अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला असल्याने अनिल देरकर यांची मोठी गोची झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर विस्थापनाची वेळ आली आहे. ते पंचायत समितीला उभे राहणार का? हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

कुंभा -मार्डी गट हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला असून येथील प्रतिनिधित्व करणाऱ्या जि. प. सदस्या अरुणा खंडाळकर या पुन्हा प्रबळ दावेदार आहेत. त्यांना आता कोण टक्कर देईल यावर या मतदार संघाचे गणित अवलंबून राहील. मात्र अरुणा खंडाळकर यांना हे आरक्षण खूप सोपे झाले असे मानले जात आहे.

पंचायत समिती गणामध्ये मोठे उलटफेर झालेले आहे. कुंभा पंचायत गणामध्ये माजी उपसभापती संजय आवारी हे प्रतिनिधित्व करीत होते. हा मतदार संघ महिलांसाठी राखीव झाला असल्याने संजय आवारी यांना जवळचाच मतदारसंघ शोधण्याची वेळ आलेली आहे.

सर्वसाधारण गणासाठी पडणार उमेदवारांच्या उद्या
मार्डी पंचायत समिती गण सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. येथे मच्छिन्द्रा येथील कुमरे आधी सदस्य म्हणून होते. आता या मतदार संघावर मोठ्या उड्या पडणार असून दावेदारांची संख्याही वाढणार आहे. बोटोनी पंचायत समिती गण हा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्याने येथील पं. स. सदस्या सुनीता लालसरे यांना विस्थापित व्हावे लागत आहे.

वेगाव गणाच्या पंचायत समिती सदस्या शीतल पोटे यांचा मतदार संघ हार्दिक नामाप्र प्रवर्गासाठी राखीव झाला असून येथेही दावेदारांची संख्या वाढणार यात संशय नाही. या आरक्षणाने कही ख़ुशी कही गम असे चित्र तालुक्यात असून अनेकांचा हिरमोड झाल्याने आता पूढे काय असा प्रश्नचिन्ह त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर निर्माण झालेला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.