सुशील ओझा, झरी: पंचायत समिती सदस्याच्या घरून होणारे रेशन वाटप बंद करण्यात आले आहे. याविरोधात लोकांनी तक्रार केली होती. हे प्रकरण वणी बहुगुणीने उचलून धरले होते. अखेर शासनाच्या जिल्हा परिषद शाळेतून रेशन वाटप सुरू झाले आहे.
तालुक्यातील मांडवी येथील कंट्रोल डीलरचा परवाना एक वर्षांपूर्वी निलंबित करण्यात आला होता. ज्यामुळे गावातील रेशनकार्ड धारकांना कंट्रोलच्या रेशन करीता भटकावे लागत होते. याच अनुषंगाने पिवरडोल येथील कंट्रोल डिलरला मांडवीचे कंट्रोल दुकान जोडण्यात आले. गावक-यांना कोणतीही अडचण न येता घरपोच धान्य मिळावे याकरिता ही सुविधा देण्यात आली होती. परंतु सदर कंट्रोल डीलर गावात तीन शासकीय इमारत असून तेथे कंटोलचे राशन उतरवून वाटप करण्याऐवजी गावातील पंचायत समिती सदस्य यांच्या घरातून कंट्रोलचे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार गावकर्यांनी तहसीलदार यांच्यासह वरिष्ठांकडे केली होती.
राजेश हे एका पक्षाचे राजकीय पदाधिकारी असल्याने इतर पक्षातील कार्यकर्ते व मतदार त्यांच्या घरून रेशन उचलण्यास धजावत होते. ज्यामुळे गावातील अनेक कुटुंबे रेशनपासून वंचित राहत होते. त्यामुळे कंट्रोलचे धान्य शिल्लक राहत होते. पंचायत समिती सदस्य च्या घरून रेशन वाटप बंद करून सरकारी इमारतीतून रेशन वाटप न केल्यास ग्रामवासीयांनी उपोषणाचा इशारा निवेदनातून दिला होता. याचा पाठपुरावा वणी बहुगुणीने वेळोवेळी केला.
अखेर सोमवारपासून शासनाच्या जिल्हा परिषद शाळेतून रेशन वाटप सुरू झाले. वणी बहुगुणीचे गावकर्यांनी आभार मानले. रेशन दुकानदारांची तक्रार संतोष आकुलवार, नितीन कल्लेवर, राकेश गलेवार, विठ्ठल माडपेलवार, संजय मडावी, महेश कोपुलवार, रवींद्र गालेवार, निखिल कर्णवार, विकास राऊत, मधुकर बनपेलवार, विनोद इंपावार, भुमांना जायरवार, सुमन सुरपाम, रेश्मा गेडाम, श्रीकांत नेलावार, जंगुबाई किनाके, सागर सुरावार, संतोष अडपावार, व प्रमोद गोल्लावार यांनी वरिष्ठांकडे केली होती.