वंचितमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, 20 पदाधिका-यांचे सामुहिक राजीनामे
नाराज गट परिचय बैठकीला राहणार गैरहजर... काय आहे गटबाजीचे कारण?
निकेश जिलठे, वणी: नुकतीच वंचित बहुजन आघाडीची तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. 44 जणांची ही जंबो कार्यकारिणी होती. मात्र त्यातील 20 पदाधिका-यांनी राजीनामे पाठवल्याने वंचितमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावार आली आहे. नवनिर्वाचित तालुका महासचिव प्रल्हाद चामाटे यांच्यासह 20 पदाधिका-यांनी नवनिर्वाचित तालुका अध्यक्षावर आक्षेप घेत पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याकडे पाठवला आहे. दरम्यान आज दुपारी 12 वाजता शहरातील विश्रामगृहात परिचय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सर्वांनाच बोलावण्यात आले आहे. मात्र नाराज गटाचे पदाधिकारी राजीनामे दिल्याने बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे कळत आहे.
राजीनामा देणा-यांमध्ये तालुका महासचिव प्रल्हाद चामाटे, उपाध्यक्ष सचिन वानखेडे, उपाध्यक्ष रमेश वाढई, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोहिते, उपाध्यक्ष सुमित सोनटक्के, सचिव सचिन मडावी, सहसचिव अनिल खोब्रागडे, सहसचिव गजानन गोंडे, सहसचिव प्रवीण उपरे, विधी सल्लागार ऍड. चंदू राऊत, सदस्य संतोष चिडे, महादेव बुरडकर, डॉ. मोरेश्वर देवतळे, पुखराज खैरे, शारदा मेश्राम, संगीता वानखेडे, विमल सातपुते, सीमा वानखेडे, वर्षा उईके, वैशाली गावंडे यांचा समावेश आहे.
काय आहे अंतर्गत गटबाजीचे कारण?
नाराज गटाचा तालुका अध्यक्ष म्हणून दिलीप भोयर यांच्या नावाला विरोध आहे. या नावाबाबत असलेला विरोध त्यांनी वरिष्ठापर्यंत पोहोचवला होता. मात्र त्यानंतर दिलीप भोयर यांना तालुका अध्यक्षपद दिले गेले. तर प्रल्हाद चामाटे यांना तालुका अध्यक्ष बनवावे असे नाराज गटाचे म्हणणे आहे. तालुका अध्यक्षपदासाठी प्रल्हाद चामाटे यांच्या नियुक्तीसाठी 44 कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीसह शिफारसपत्र पाठवण्यात आले होते. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने केलेल्या कार्यकर्त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून नुकताच पक्षात प्रवेश केलेल्या व्यक्तीला तालुका अध्यक्ष यासारखे मोठे पद दिले गेले. त्यामुळे सामुहिक राजीनामा देत आहोत, असे नाराज गटाचे म्हणणे आहे.
दुसरीकडे दिलीप भोयर हे ओबीसी समाजातील एक महत्त्वाचे नेते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध आंदोलन त्यांनी केले आहे तसेच सर्वसामान्यांचे विविध प्रश्न ते कायम उचलतात. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणे ही पक्षाची भूमिका असल्याने या पदावर योग्य व्यक्तीची निवड झाली आहे, असे दुस-या गटाचे म्हणणे आहे.
सुरुवातीपासूनच गोंधळ सुरू
वंचितच्या कार्यकारिणीसाठी 3 एप्रिल 2021 रोजी दोन वेगवेगळ्या गटाची दोन वेगवेगळ्या ठिकाणी बैठक झाली. एका गटाची बैठक नगाजी महाराज देवस्थान इथे तर दुसरा (नाराज) गटाची दामले नगर येथील एका घरी बैठक झाली. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्षांनी या दोन्ही बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत कार्यकारिणीसाठी अर्ज भरून घेण्यात आले. जिल्हाध्यक्षांना दोन्ही गटाची एकत्रीत बैठक एकाच ठिकाणी घेता आली असती. मात्र यात जिल्हाध्यक्ष अपयशी ठरले. हा गोंधळ जिल्हाध्यक्षांना दूर करता आला नाही. उलट दोन्ही ठिकाणी भेट देऊन त्यांनी एक प्रकारे गटबाजीला प्रोत्साहनच दिले. भविष्यात हा वाद चव्हाट्यावर येणारच होता. अखेर कार्यकारिणी जाहीर झाल्यावर ही अंतर्गत गटबाजी पुढे आली. यात नवीन काहीच नाही असे राजकीय क्षेत्रातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.
विरोध डावलून पदाची नियुक्ती: प्रल्हाद चामाटे
मी वंचितच्या स्थापनेपासून पक्षात आहे. आधी मी उपाध्यक्ष पदावर होतो. त्यामुळे माझी तसेच कार्यकर्त्यांची यापेक्षा वरच्या म्हणजे तालुका अध्यक्षपदाची मागणी होती. त्याबाबचे पत्रही कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे पाठविले होते. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मी केवळ पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भविष्यातही वंचितचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार.
– प्रल्हाद चामाटेचर्चेतून वाद सोडवला जाऊ शकतो: दिलीप भोयर
पक्षात जो काही वाद किंवा गटबाजी समोर आली आहे. ती पक्षहितासाठी नाही. आगामी निवडणुकांमध्ये सोबत काम केले तरच ते पक्षाच्या हिताचे राहिल. जो काही अंतर्गत वाद आहे तो चर्चेतून सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. जे कुणी नाराज आहे त्यांची मनधरणी करण्यास मी सदैव तयार आहे. जी काही नाराजी असेल ती चर्चेतून दूर करता येईल. त्यांनी सोबत यावे व एकत्र काम करावे.
– दिलीप भोयर, नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष वंचित
वंचितमधील अंतर्गट गटबाजी व वादामुळे वंचितचे समर्थक हादरले आहेत. लवकरच नगरपालिकेसह इतरही निवडणुका आहेत. केवळ पदासाठी असलेला पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. जर वेळीच हा वाद सुटला नाही त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत होऊ शकते. त्यामुळे हा वाद लवकरात लवकर सोडवावा अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्ते व वंचित समर्थक व्यक्त करीत आहे.
हे देखील वाचा:
‘मरणे झाले स्वस्त, जगणे झाले महाग’ वणीत काँग्रेसचे अनोखे आंदोलन